Sun, Sep 23, 2018 06:40



होमपेज › Konkan › ‘जैतापूर’ अन् ‘नाणार’ची आरपार लढाई

‘जैतापूर’ अन् ‘नाणार’ची आरपार लढाई

Published On: Aug 24 2018 10:35PM | Last Updated: Aug 24 2018 10:35PM



रत्नागिरी : शहर वार्ताहर

बर्‍याच अवधीनंतर जैतापूर अणुऊर्जा आणि नाणार रिफायनरी प्रकल्प विरोधाचे वारे जोरात वाहणार आहेत. ‘जैतापूर’च्या अनुषंगाने 27 रोजी जेलभरो, तर 31 ऑगस्ट रोजी रिफायनरी प्रकल्पाविरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील आठवडा या दोन आंदोलनांचा असणार आहे. जिल्ह्यात अशी आंदोलने यापूर्वीही झाली आहेत. मात्र, पुढच्या आठवड्यातील आंदोलनातून प्रकल्पविरोधकांची संघर्ष यात्रा सुरू होणार आहे. 

आशिया खंडातील सर्वात मोठी रिफायनरी अर्थात तेल शुद्धीकरण प्रकल्प कोकणात उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प प्रामुख्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या सीमेवरील नाणार परिसरात उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या प्रमुख तेल कंपन्या एकत्र येणार आहेत. या प्रकल्पात तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. दुसरीकडे, माडबन परिसरात जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प हा जगातील सर्वात मोठी गुंतवणूक असलेला प्रकल्प होणार आहे. मुळात एकाच तालुक्यात, जवळजवळ 25 कि.मी.च्या परिघात असे दोन प्रकल्प होणार आहेत. या प्रकल्पांच्या विरोधात विविध राजकीय पक्ष सोयीनुसार भूमिका घेत आहेत. 

शिवसेनेने दोन्ही प्रकल्पांना विरोध करणार्‍या स्थानिकांना पाठिंबा दर्शवला आहे. भाजपने दोन्ही प्रकल्पांना विरोध केलेला नाही. उलट, समर्थनाची भूमिका भाजपची दिसते. काँग्रेसचा जैतापूरला पाठिंबा, तर नाणारला विरोध असा दुटप्पी पवित्रा आहे. राष्ट्रवादीचा सूरही काँग्रेसच्या जवळपासचा आहे. काँग्रेसमध्ये असताना जैतापूरला नारायण राणे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. आता मात्र रिफायनरी प्रकल्पाला त्यांचा विरोध आहे. राणेंची ही भूमिका त्या-त्यावेळेनुसार आहे. ‘मनसे’ने जैतापूरविरोधात ना सूर आळवला ना त्याचे समर्थन केले. मात्र, रिफायनरी विरोधात जनतेच्या पाठिशी ठाम उभे राहण्याची भूमिका ‘मनसे’ची आहे. आता राहता राहिला विरोध स्थानिकांचा तर तो मच्छीमार, शेतकरी, प्रकल्पग्रस्तांचा विरोध हा त्यांच्या जाणार्‍या जमिनी, उदरनिर्वाह, विस्थापित होण्याची भीती, प्रदूषणाच्या मुद्यावर तर आहेच शिवाय प्रकल्पाच्या सुरक्षिततेच्या प्रश्‍नावरही हा विरोध आहे. त्यामुळे आगामी काळात होणारी आंदोलने ही या विरोधाची धार ठरवणारी ठरणार आहेत.

विरोधात होणारी आंदोलने एकत्रित झाल्यास एकीचे बळ दिसून येईल. त्यामुळे सरकारला काहीतरी निर्णय घेण्यास भाग पडेल. परंतु, सध्या शिवसेना आणि प्रकल्पग्रस्त अशी आंदोलने होत आहेत. शिवसेनेच्यादृष्टीने दोन्हीकडे विरोधाची भूमिका असताना दोन्ही आंदोलने एकत्रित होण्याची गरज आहे. त्यामुळेच कदाचित  ‘जैतापूर’च्या अनुषंगाने 27 रोजी जेलभरो, तर 31 ऑगस्ट रोजी रिफायनरी प्रकल्पाविरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे. अणुऊर्जा प्रकल्प विरोधात जनहक्क समिती व शिवसेना पक्षातर्फे जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे.