Tue, Jul 16, 2019 01:36होमपेज › Konkan › शिक्षक भरतीच्या रॅकेटची चौकशी करा

शिक्षक भरतीच्या रॅकेटची चौकशी करा

Published On: Apr 27 2018 10:26PM | Last Updated: Apr 27 2018 9:17PMरत्नागिरी : प्रतिनिधी

शिक्षक भरती सुरू होण्याच्या मार्गावर असतानाच गुण वाढवून देण्याच्या रॅकेटने राज्यभरात खळबळ उडाली आहे. सन 2010 प्रमाणे आताच्या भरतीतही गैरप्रकार घडत असून गुण वाढवून देण्याबाबतचे संभाषणही व्हायरल झाले आहे. या रॅकेटची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे डीएड्, बीएड् धारकांच्या संघटनेने निवेदनातून केली.
एमपीएससीमध्ये झालेला गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर सध्या शिक्षक भरतीचा मुद्दा चर्चेत आला आहे. भरती प्रक्रियेत गुण वाढवून देण्याचे संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि हे प्रकरण उघडकीस आले आहे. याबाबत औरंगाबाद व  मुखेड ( जि. नांदेड) येथील पोलिस ठाण्यात तक्रार देखील करण्यात आली.

डिसेंबर 2017 मध्ये शिक्षक भरतीसाठी राज्यभरात अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी घेण्यात आली. चार महिने उलटले तरी अद्याप  भरती प्रक्रिया सुरू झालेली नाही.  एखादी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इतका कालावधी का लागतो? असा सवालही संघटनेने ना. तावडे यांच्याशी बोलताना केला. 

राज्य सरकारने या परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जानेवारी महिन्यात जाहीर केला. मात्र, या निकालात आणि परीक्षा झाल्यावर दाखवलेल्या गुणांमध्ये 1 ते 30 गुणांपर्यंत तफावत आढळून आली होती. याबाबतचे आक्षेप देखील परीक्षार्थींनी नोंदवले होते. ही स्थिती एका बाजूला असताना दुसर्‍या बाजूला  आता गुण वाढवून देण्याच्या रॅकेटने राज्यात धुमाकूळ घातला आहे. निम्मे पैसे सुरुवातीला द्या आणि उर्वरित पैसे  गुण वाढल्यानंतर द्या, असे आमिषच देण्यात येत असून याबाबतचे संभाषण ना. तावडे यांना ऐकवण्यात आले.

गेली आठ वर्षे भरती झालेली नाही.  गुण वाढवण्याच्या प्रकारामुळे भरतीची वाट पाहणार्‍या भावी शिक्षकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. परिणामी अभियोग्यता चाचणी आणि पवित्र पोर्टलच्या पारदर्शकतेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले असून याबाबत सखोल चौकशी व्हावी व संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी डीएड्, बीएड् स्टुडण्ट असोसिएशनचे राज्याध्यक्ष संतोष मगर यांनी ना. तावडेंकडे केली. यावेळी शिष्टमंडळाचे परमेश्‍वर इंगोले, प्रशांत शिंदे, दीपाली भोसले, वैभव गरड उपस्थित होते.