Sun, May 19, 2019 13:58
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › आंतरजातीय विवाह योजनेच्या व्याप्तीत वाढ

आंतरजातीय विवाह योजनेच्या व्याप्तीत वाढ

Published On: Aug 09 2018 10:27PM | Last Updated: Aug 09 2018 10:25PMरत्नागिरी : प्रतिनिधी

 जाती भेदाभेद कमी होऊन बंधुभाव निर्माण व्हावा, परस्पर रोटी-बेटी व्यवहार व्हावेत, यासाठी शासनाने 1996 साली ‘आंतरजातीय प्रोत्साहन विवाह योजना’ आणली. या योजनेतून आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांचा सत्कार करणे, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान देण्यात येऊ लागले. या योजनेचा विस्तार झाला आहे. जिल्ह्यात या योजनेचा गेल्या दोन वर्षांत 124 जोडप्यांनी लाभ घेतला. शासनाकडून त्यांना 61 लाख 30 हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे.

सन 1996 साली ही योजना आणण्यात आली. त्यावेळी या जोडप्यांना संसारपयोगी साहित्य घेण्यासाठी पंधरा हजारांचे अनुदान देण्यात येत होते. या तुटपुंज्या अनुदानाकडे अनेक आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांनी पाठ फिरविली. त्यामुळे ही योजना बारगळण्याची स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शासनाने या योजनेचे प्रोत्साहनपर अनुदान वाढविण्याची घोषणा केली आणि हे अनुदान एक फेब्रुवारी 2010 रोजी 50 हजार इतके केलेे. हे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होते. त्यामुळे पुन्हा एकदा ही योजना भरारी घेऊ लागली आहे.

जिल्ह्यात सन 2016-17 मध्ये या योजनेचा 44 जोडप्यांनी लाभ घेतला. त्यांना 21 लाख 30 हजारांचे अनुदान वाटप करण्यात आले. तसेच सन 2017-18 मध्ये 80 जोडप्यांना 40 लाखांचे अनुदान देण्यात आले. जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडे अजूनही 80 प्रस्ताव प्राप्त झाले असून शासनाकडून निधी प्राप्त होताच या जोडप्यांचाही सत्कार करण्यात येणार आहे.

लाभार्थी जोडप्यांना विवाहाचा दाखला, जातीचा दाखला, दोघांचा शाळा सोडल्याचा दाखला, रहिवाशी दाखला, वर्तणूक दाखला ही कागदपत्रे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात द्यावी लागतात. त्यानंतर या जोडप्यांचा या योजनेत सहभाग करून घेतला जातो. पण, या योजनेचा लाभ घेण्याची माहिती अनेक जोडप्यांना नसल्याने ते या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे येत नाहीत. यावर्षी समाजकल्याण विभागाने या योजनेचा लाभ सर्व लाभार्थी जोडप्यांना मिळावा यासाठी प्रयत्न सुरू केला आहे.