Mon, May 27, 2019 06:52होमपेज › Konkan › पायाभूत, नैदानिक चाचण्या रद्द होणार

पायाभूत, नैदानिक चाचण्या रद्द होणार

Published On: Mar 11 2018 10:44PM | Last Updated: Mar 11 2018 10:38PMरत्नागिरी : प्रतिनिधी

मागील तीन वर्षांपासून राज्यातील शाळांमध्ये सुरू असलेल्या पायाभूत चाचण्या बंद करण्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी तत्वतः मान्य केले आहे. सातत्याने शिक्षक परिषदेने ही मागणी लावून धरली होती. या मागणीला न्याय मिळाला आहे, असे रत्नागिरी संपर्कप्रमुख आनंद शेलार यांनी सांगितले.

ते म्हणाले की, शिक्षक परिषदेचे अध्यक्ष वेणूनाथ कडू, आमदार नागो गाणार यांनी शिक्षणमंत्र्यांची भेट घेऊन पायाभूत व नैदानीक चाचणी बंद करण्याची मागणी केली. मागील तीन वर्षांपासून राज्यातील शाळांमध्ये पायाभूत चाचण्यांचे आयोजन शिक्षण विभागाकडून होत आहे. अप्रगत विद्यार्थी शोधून त्यांना प्रगत करणे या हेतूने सुरू करण्यात आलेल्या या चाचण्यांबाबत अनेक संभ्रम निर्माण झाले होते. अनेक शाळांमध्ये पायाभूत परीक्षांसोबतच शालेय स्तरावरच्या परीक्षांचे आयोजन केल्यामुळे विद्यार्थ्यांना दोन-दोन परीक्षांना सामोरे जात लागत होते. शिक्षकांना दोन्ही परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासण्याचा ताण सहन करावा लागत होता.

या चाचण्यांमुळे राज्यभरातील विद्यार्थ्यांचा संबंधित विषयांचा डेटा शासनाकडे संकलित झाला आहे. यापुढे प्रत्यक्ष अप्रगत विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून वाचन क्षमता कमी असणार्या विद्यार्थ्यांसाठी मूलभूत वाचन क्षमता सारखे प्रशिक्षण शिक्षण विभागाने सुरू केले आहे. यापुढे संकलित झालेल्या माहितीमुळे शिक्षण विभागाला अनेक उपक्रम, प्रशिक्षण हाती घेता येणार असल्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढणार आहे, असे आनंद शेलार यांनी सांगितले.