Sun, Jun 16, 2019 02:52होमपेज › Konkan › आंबा परिषदेत महत्त्वपूर्ण शिफारशी

आंबा परिषदेत महत्त्वपूर्ण शिफारशी

Published On: May 13 2018 10:22PM | Last Updated: May 13 2018 9:29PMरत्नागिरी : प्रतिनिधी

वेंगुर्ले येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात झालेल्या आंतरराष्ट्रीय आंबा परिषदेत शास्त्रज्ञांनी आंब्याच्या विविध समस्यांवर प्रकाशझोत टाकताना त्यावर उपाय सुचविले. कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. किसन लवांदे यांनी इतर पिकांप्रमाणे आंब्याचाही राष्ट्रीय बोर्ड तयार करण्याची मागणी केली. या परिषदेत ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञ डॉ. पिंग लू यांनी तसेच अन्य शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन करताना जागतिक आंबा परिषदेत महत्त्वाच्या शिफारशी केल्या.

अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य, डॉ पिंग लू, डॉ. किसन लवदे, डॉ. व्हिक्टर गॅलन यांनी भूषविले. तीन दिवस सुरू असलेल्या जागतिक आंबा परिषदेत चीन, स्पेन, थायलंड, ऑस्ट्रेलियासह जगभरातील 312 आंबा शास्त्रज्ञ सहभागी झाले. जागतिक बाजारपेठेसाठी भारतीय आंबा उत्पादकांनी परदेशी जातीची आंबा लागवड करावी व भारतीय आंब्याची विक्री परदेशातील निवडक बाजारपेठांमध्ये करावी, असे यावेळी डॉ. गॅलन म्हणाले.

जागतिक स्तरावरील विविध संस्थांच्या मदतीने आंबा पिकासाठी आदर्श पीक पद्धती तयार करावी, असे डॉ. पिंग लू यांनी सांगितले. दुष्काळ आणि उष्णतेवर मात करण्यासाठी योग्य व्यवस्थापन, पाणी, खत, वनस्पती संप्रेरक याचा वापर करावा, असे यावेळी डॉ. दारूनी नेफोन म्हणाले.डॉ. डी. के. पाल यांनी झिओलाइटचे प्रमाण जास्त असलेल्या लाल माती आंबा उत्पादनासाठी उत्तम असल्याचे सांगितले.

गोवा येथील डॉ. एकनाथ चाकूरकर यांनी आंबा बागेतून शाश्‍वत उत्पन्न घेण्यासाठी एकात्मिक शेती व्यवस्था व पशुपालन कृषिवनिका यांचा समावेश करावा, असे सांगितले. डॉ. एस. एस. नारखेडे यांनी भारतातील आंब्याच्या जैवविविधतेचे संवर्धन करणे नमूद केले. परिषदेचा समारोप डॉ. नितीन गोखले यांनी केला.