Mon, Mar 18, 2019 19:21होमपेज › Konkan › शासकीय कामकाज ठप्प

शासकीय कामकाज ठप्प

Published On: Aug 07 2018 10:54PM | Last Updated: Aug 07 2018 10:17PMरत्नागिरी : प्रतिनिधी

सातव्या वेतन आयोगाची तात्काळ अंमलबजावणी व्हावी, या प्रमुख मागणीसाठी शासकीय, निमशासकीय कर्मचार्‍यांसह शिक्षकांनी मंगळवारपासून तीन दिवसांच्या संपाला सुरुवात केली. सुमारे 11 हजार कर्मचार्‍यांच्या सहभागाने झालेल्या या संपामुळे मंगळवारी दिवसभर शासकीय कामकाज ठप्प झाले. 

संपात जिल्हा परिषदेचे कर्मचारी, सरकारी रुग्णालयांच्या कर्मचार्‍यांचाही सहभाग असल्याने या संपाचे परिणाम जिल्ह्याच्या प्रशासकीय कामावर झाले. त्यामुळे मंगळवारी दिवसभर शासकीय कार्यालये ओस पडली होती. तीन दिवसांच्या या संपाची सुरुवात पहिल्या दिवशी सर्वच तालुक्यांत शासकीय कर्मचार्‍यांनी मोर्चे काढून  तसेच शासकीय कार्यालयांवर निदर्शने केली.

राज्य मध्यवर्ती शासकीय  कर्मचारी संघटनेने सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीच्या प्रमुख मागणीसह अन्य विविध मागण्यांसाठी मंगळवारपासून संप केला. संपात प्रथम वर्ग अधिकार्‍यांचा अपवाद गळता वर्ग दोन, तीन आणि 4 चे सर्व कर्मचारी सहभागी झाल्याचा दावा जिल्हा संघटनेने केला. मात्र, प्रथम वर्ग अधिकार्‍यांच्या संघटनेने या संपाकडे पाठ फिरविल्याने अनेक कार्यालयांत मुख्य अधिकारी उपस्थित तर सहकारी कर्मचारी गायब असे चित्र होते. 

संपाच्या पार्श्‍वभूमीवर  संघटनेने  आठवडाभर वातावरण निर्मितीसाठी  गेटसभा घेतल्या. लेखणीबंद, काळी फीत अशी आंदोलने केली होती. त्यानंतरही राज्यस्तरावर  चर्चा निष्फळ ठरल्याने अखेर तीन दिवसांच्या संपाने शासकीय कर्मचार्‍यांनी एल्गार पुकारला असल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष रुपेंद्र शिवलकर यांनी सांगितले. सकाळी कर्मचार्‍यांनी कार्यालयात न जाता जिल्हाधिकारी कार्यलायाबाहेर निदर्शने केली. या निदर्शनात  जिल्हा परिषद, नगर पंचायत आणि शिक्षक संघटनांनी सहभाग घेतला. संपात जिल्हा प्रशासनासह सरकारी रुग्णालयातील कर्मचारी यांचा समावेश होता. त्यामुळे या व्यवस्थापनांचे कारभार दिवसभर ठप्प पडले.

संपात 14 संघटनांचा सहभाग

राज्यस्तरीय शासकीय कर्मचार्‍यांच्या संपाने प्रशासकीय कामकाज ठप्प झाले असताना आगामी दोन दिवसही हीच स्थिती अटळ असल्याची माहिती जिल्हा शासकीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रुपेंद्र शिवलकर यांनी दिली. या संपात शासकीय आणि निमशासकीय कर्मचार्‍यांच्या जिल्ह्यातील 14 संघटना सहभागी झाल्या. यामध्ये  प्राथमिक शिक्षक समिती, पदवीधर शिक्षक व केंद्रप्रमुख संघटना, प्राथमिक शिक्षक संघ, जिल्हा शासकीय कर्मचारी संघटना, कास्ट्राईब शिक्षक संघटना, वाहन चालक संघटना,  चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना, पुरोगामी शिक्षक संघटना, माध्यमिक अध्यापक संघ, शिक्षकेतर कर्मचारी संघटना, अखिल भारतीय शिक्षक संघटना, शिक्षण विस्तार अधिकारी संघटना, जिल्हा तलाठी संघ आदी संघटनांचा समावेश आहे.