होमपेज › Konkan › वाटद येथील ‘त्या’ शिक्षकाला नोकरीतून काढा

वाटद येथील ‘त्या’ शिक्षकाला नोकरीतून काढा

Published On: Jul 21 2018 10:45PM | Last Updated: Jul 21 2018 10:33PMरत्नागिरी : प्रतिनिधी

तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटद - खंडाळा येथील एका उपशिक्षकाच्या गैरवर्तनाबाबत विद्यार्थी, ग्रामस्थ, शाळेतील इतर शिक्षकांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. विद्यार्थ्यांना दुखापत होईल, अशा रितीने ते मारतात. ही बाब गंभीर आहे. त्यांचे वर्तन पाहिले असता त्यांना नोकरीतूनच काढून टाकण्यात यावे, असा ठराव शनिवार दि. 21 रोजी झालेल्या पंचायत समितीच्या मासिक सभेत करण्यात आला. 

पंचायत समितीची मासिक सभा सभापती विभांजली पाटील यांच्या अध्यक्षतेखाली येथील शामराव पेजे सभागृहात शनिवारी झाली. या सभेला गटविकास अधिकारी विद्या गमरे यांच्यासह सर्व सदस्य, विविध खात्यांचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. प्रभारी गटशिक्षणाधिकारी भाग्यश्री हिरवे या सभागृहासमोर शिक्षण विभागाचा आढावा घेत असताना सदस्य गजानन पाटील यांनी वाटद खंडाळा प्राथ. शाळेतील उपशिक्षकाविरुद्ध विद्यार्थी, पालक तसेच शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचार्‍यांच्या तक्रारींचा पाढा वाचला. हे शिक्षक इ. तिसरी  व चौथीच्या मुले व मुलींना डस्टर व पट्टीने मारहाण करतात. तसेच मुलींचा गळा दाबणे, केस ओढणे, पाठीत जोराने मारणे असे प्रकार सातत्याने करत असल्याबाबत विद्यार्थ्यांनी सांगितल्याचे पाटील यांनी सभागृहासमोर सांगितले. 

त्यांच्याबाबत अध्यापनाच्या देखील अनेक तक्रारी आहेत. दि. 13 जुलै रोजी शाळा भेटीच्या वेळी दोन्ही वर्गांचे वार्षिक नियोजन, मासिक नियोजन, घटक नियोजन व इतर उपक्रमांचे नियोजन केले नसल्याचे आढळून आले. अनधिकृत रजेवर असतानाही शाळेत हजर झाल्यावर हजेरी पुस्तकात उपस्थितीची स्वाक्षरी केलेली आहे. अनधिकृत रजेवर असताना शिक्षक हजेरीमध्ये पगार होत नसल्याने अध्यापनावर बहिष्कार टाकत असल्याबाबत दाभाडे यांनी नोंद केली आहे. 

याबाबत शिक्षण विभागाने  त्यांच्याकडे विचारणा केली असता शिक्षण विभागातील शिक्षण विस्तार अधिकार्‍यांसह काही कर्मचार्‍यांना देखील दमदाटी करून त्यांच्याशी मानहानीकारक वर्तन केले. एवढेच नव्हे तर त्यांनी शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचार्‍यांविरोधात जयगड पोलिस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटीची तक्रार दाखल केली  आहे.  

या शिक्षकाचा पूर्वइतिहास पाहिला असता मंडणगडहून त्यांची बदली संगमेश्‍वर येथे करण्यात आली होती. संगमेश्‍वर येथील शाळांमधील तक्रारींवरून त्यांचे निलंबन करण्यात आले होते. त्यानंतर ते रत्नागिरी तालुक्यात हजर झाले. अजूनही त्यांच्याबाबतीत तक्रारी वाढत असून, ही बाब गंभीर आहे. याबबात पंचायत समितीच्या सर्व सदस्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. दाभाडे यांना केवळ निलंबित करून चालणार नाही तर त्यांना सेवेतून काढून टाकावे,अशी मागणी सदस्यांनी लावून धरली. तसा ठराव मासिक सभेत करण्यात आला.