Fri, Jul 19, 2019 01:14होमपेज › Konkan › ...अखेर पूर्वापार पाऊलवाट खुली

...अखेर पूर्वापार पाऊलवाट खुली

Published On: Aug 15 2018 1:24AM | Last Updated: Aug 15 2018 12:02AMरत्नागिरी : योगेश हळदवणेकर

न्यायालय, जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार यांच्या आदेशाचा अवमान करीत तालुक्यातील सुप्रसिद्ध अशा गणपतीपुळे येथे बागवाडीकडे जाणारी पूर्वापार पाऊलवाट  बंद करण्यात आली होती. याबाबत ‘दै. पुढारी’ने आवाज उठवताच ही पाऊलवाट मोकळी करण्याची कारवाई ग्रामपंचायतीने जयगड पोलिसांच्या मदतीने केली. त्यामुळे कित्येक वर्षे आपल्या घरापासून दूर राहणार्‍या सुधीर माने यांना आपल्या हक्काच्या घरात जाण्याचा मार्ग खुला झाला आहे.

गणपतीपुळे  येथे बागवाडीकडे जाणारी पूर्वापार पाऊलवाट करण्यात आली होती. त्यामुळे तेथील रहिवासी सुधीर माने यांच्या घरात जाण्याचा मार्गच बंद झाला होता. ही वाट पूर्वापार असल्याने यावर माने यांच्यासह अन्य सहा ग्रामस्थांनी न्यायालय, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार अशा स्तरांवर आवाज उठवला. त्यानंतर सर्वच ठिकाणी माने यांच्यासह अन्य सहाजणांच्या बाजूने निकाल लागला. अगदी ते बंद केलेली पाऊलवाट मोकळी करण्याचे आदेश ग्रामपंचायतीसह जयगड पोलिस ठाण्याला देण्यात आले होते. मात्र, त्यांनी या आदेशांना वाटाण्याच्या अक्षता लावत अवमान केला होता. 

शेवटी ग्रामपंचायतीच्या कुचकामी कारभाराला कंटाळून सुधीर माने यांनी बेमुदत उपोषण करण्याचा पवित्रा घेतला. याबाबत ‘पुढारी’ने वारंवार वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल खुद्द शिवसेना आ. उदय सामंत आणि ज्येष्ठ नेते गजानन तथा आबा पाटील यांनी घेत सरपंचासह संबंधितांना धारेवर धरले. आ. उदय सामंत यांनी सरपंचाला डोस देताच सरपंचाने कारवाई करण्याबाबत तात्काळ संबंधित जितेंद्र जोशी व कुमार जोशींना नोटीस बजावली. त्यानंतर दि. 14 ऑगस्ट रोजी   आपल्या लवाजम्यासह हे अनधिकृत बांधकाम हटवले. हे बांधकाम हटविताना मंडळ अधिकारी शाम पाटील, तलाठी पी.एल.पोले,  पोलिस पाटील विश्‍वनाथ पाटील,  सरपंच महेश ठावरे व अन्य ग्रामपंचायत सदस्य, पोलिसांचे पथक यावेळी उपस्थित होते. या कारवाईत ग्रामपंचायतीने पाऊलवाटेवर बसवण्यात आलेले गेट जप्त केले आहे. ही कारवाई होताना जितेंद्र जोशी आणि त्यांच्या पत्नीने सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. तरीही पोलिस आणि ग्रामपंचायतीने उशिरा का होईना पूर्वीच्या सगळ्या आदेशांची अंमलबजावणी केली आहे.  अर्थात ग्रामपंचायतीला हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे, अशी चर्चा आता रंगली आहे. ही कारवाई झाल्यानंतर सुधीर माने यांनी उपोषण करणार नसल्याचे सांगितले.