Tue, Jul 16, 2019 22:29होमपेज › Konkan › गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर आणखी चार गाड्या

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर आणखी चार गाड्या

Published On: Aug 05 2018 9:59PM | Last Updated: Aug 05 2018 9:41PMरत्नागिरी : खास प्रतिनिधी

दि. 13  सप्टेंबरपासून सुरु होणार्‍या गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर जाहीर करण्यात आलेल्या आणखी काही विशेष गाड्यांना डबे वाढवण्याबरोबरच लो. टिळक टर्मिनस ते सावंतवाडी दरम्यान विशेष गाड्यांच्या चार नवीन फेर्‍या रेल्वेने जाहीर केल्या आहेत. जादा गाड्या सुरु करुनही तिकीट खिडक्यांवरील गर्दी कमी होण्याचे नाव घेत नसल्याने रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. यामुळे गणपतीसाठी कन्फर्म तिकीट  न मिळालेल्या चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे.

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर मे महिन्यात पहिल्या काही विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली. मात्र, या गाड्यांचे आरक्षण खुले होताच पुढील काही तासातच ते फुल्‍ल होत असल्याने रेल्वेला आरक्षण स्थिती पाहून नव्या विशेष गाड्या जाहीर कराव्या लागत आहेत. त्यानुसार रविवारी कोकण रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंताडी मार्गावर विशेष गाड्यांच्या चार नवीन फेर्‍या जाहीर केल्या आहेत.

नव्याने जाहीर करण्यात आलेल्या गणपती विशेष गाड्यांमध्ये (01095/01096)  ही गाडी दि. 11 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजून 20 मिनिटांनी लो. टिळक टर्मिनसहून सुटून त्याच दिवशी रात्री 11.50 वा. ती सावंतवाडीला पोहोचेल. या गाडीचा परतीचा प्रवास दि. 12 सप्टेेंबर रोजी सकाळी 6 वा. सावंतवाडी स्थानकावरुन सुरु होईल आणि त्याच दिवशी सायंकाळी 6.30 वा. तो लो. टिळक टर्मिनसला संपेल. 17 डब्यांची ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्‍वर, रत्नागिरी, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ तसेच झाराप या स्थानकांवर थांबणार आहे.

 याच मार्गावर दुसरी विशेष गाडी (01103/01104) दि. 13 व 15 सप्टेंबर रोजी धावणार आहे. ही गाडी लो. टर्मिनसहून पहाटे 5.33 वा. सुटेल आणि त्याच दिवशी ती सावंतवाडीला सायंकाळी 4.30 वा. पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी ही गाडी सावंतवाडीहून दि. 14 व 16 सप्टेंबर रोज सकाळी 6 वा. सुटेल आणि त्याच दिवशी ती सायंकाळी 6.30 वा. मुंबईत लो. टर्मिनस स्थानकावर पोहोचेल. या गाडीलाही ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्‍वर, रत्नागिरी, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ तसेच झाराप हे थांबे देण्यात आले आहेत.

 या गाड्यांशिवाय पुणे सावंतवाडी (01421/22) तसेच  मुंबई सेंट्रल मंगळुरु (09001/09002) या दोन गाड्यांना प्रत्येकी दोन जादा डबे जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे या गाड्या आता अनुक्रमे 18 व 21 डब्यांच्या धावणार आहेत.