Mon, Apr 22, 2019 22:16होमपेज › Konkan › शेतकर्‍यांच्या उन्‍नतीसाठी जिल्ह्यात ५ प्रक्रिया उद्योग

शेतकर्‍यांच्या उन्‍नतीसाठी जिल्ह्यात ५ प्रक्रिया उद्योग

Published On: Aug 05 2018 9:59PM | Last Updated: Aug 05 2018 9:59PMरत्नागिरी : प्रतिनिधी

शेतकर्‍यांच्या आर्थिक  उन्‍नतीसाठी महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात 5 शेतकरी कंपन्या स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील हा पहिलाच अभिनव प्रयोग आहे. यातून शेतकरी उद्योजक घडविण्यावर भर दिला जाणार आहे. या कंपन्यांच्या माध्यमातून बिजोत्पादन व शेतीमालाच्या ग्रेडिंग, पॅकिंगचे काम केले जाणार आहे. शेतकर्‍यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देण्याचे काम या कंपन्यांच्या माध्यमातून होणार असून शेतमालाचे गुणवत्ता वाढवण्यावरही भर दिला जाणार आहे.
आत्मांतर्गत महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पांतर्गत उत्पादक कंपनी कायदा 1956 अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. राज्यात सर्वत्रच हा उपक्रम राबविला जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत शेतकरी कंपनी स्थापन करण्यासाठी प्रत्येकी साडेतेरा लाखांचे अनुदान दिले जाणार आहे. तर संचालक मंडळाने साडेचार लाखांचे अनुदान गोळा करायचे आहे. प्रत्येक कंपनीसाठी सुमारे 18 लाखांची आवश्यकता आहे. या कंपनीमध्ये साडेतीनशे शेतकर्‍यांचा समावेश करण्यात येणार आहे.

रत्नागिरी, खेड, दापोली येथे प्रत्येकी एक व चिपळूणमध्ये दोन अशा पाच कंपन्या स्थापन केल्या जाणार आहेत. रत्नागिरी तालुक्यामध्ये भात प्रक्रिया, चिपळूण-असुर्डेमध्ये मँगोपल्प युनिट, खेड, चिपळूणमध्ये भाजी आणि फळ प्रक्रिया तर दापोलीमध्ये काजू प्रक्रिया युनिट सुरू केले जाणार आहे. या कंपन्या स्थापन करण्याच्या द‍ृष्टीने आत्मांतर्गत पावले उचलण्यात आली आहेत. यामुळे शेतकर्‍यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळून त्यांची आर्थिक उन्‍नतीही साधता येणार आहे. त्याचप्रमाणे शेतमालाचा दर्जा व गुणवत्ता वाढीसाठीही या कंपन्या प्रयत्न करणार आहेत.

सद्य परिस्थितीत बाजारपेठेचा विचार करता शेतमाल विक्रीमध्ये दलालांची मोठी साखळी कार्यरत आहे. शेतकर्‍यांच्या मालाला कमी दर मिळत असल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्याचबरोबर हवामान बदल आणि बाजारपेठेची अनिश्‍चितता यामुळेही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळेच शेतकर्‍यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी आत्मांतर्गत शेतकरी कंपनी स्थापन करण्याची योजना हाती घेण्यात आली आहे.