Wed, Mar 20, 2019 08:33होमपेज › Konkan › कोकणातील चाळीस गावांना मच्छीमारी दर्जा

कोकणातील चाळीस गावांना मच्छीमारी दर्जा

Published On: Jul 20 2018 11:24PM | Last Updated: Jul 20 2018 11:17PMरत्नागिरी : प्रतिनिधी

मासेमारी व्यवसायाच्या विकासाबरोबरच मच्छीमार या व्यावसायिक समाजाचीही प्रगती व्हावी, यासाठी राज्य शासनाने कोकण किनारपट्टी भागातील पाच जिल्ह्यांत विखुरलेल्या 40  गावांना ‘मच्छीमारी गावे’ (फिशरमन्स व्हिलेज) म्हणून दर्जा  देण्याची तयारी केली आहे.  या गावांना विविध व्यावसायिक सुविधा उपलब्ध करून देताना व्यावसायिक विकासासाठी अनुदानही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

ब्रिटिश काळात मुंबईसारख्या शहरात कोळीवाडे होते. त्यामुळे संघटित राहिलेल्या या व्यावसायिक समाजासाठी संघटितपणे योजना राबविणे शक्य होते. ही व्यावसायिक प्रभागीय पद्धत बदलत्या आधुनिकीकरणात विरुन गेली. मात्र, त्यामुळे मोठ्या संख्येने असलेले ही व्यावसायिकता उपेक्षित राहिली. आता त्यांना संघटित करण्यासाठी कोकणातील पाच जिल्ह्यांत मासेमारी गावे विकसित करण्यात येण़ार आहेत. या योजनेच्या माध्यमातून गावांना मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.  योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात मच्छीमार लाभार्थ्यांना नौकांच्या यांत्रिकीकरणासाठी अनुदान  देण्यात येणार आहे. या माध्यमातून पाच जिल्ह्यांतील 40 मासेमारी गावांना दीड हजार नौकांचे यांत्रिकीकरण करुन देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच या नौकांच्या यांत्रिकीकरणाबरोबरच वातानुकूलित साठवण आणि वाहतुकीसाठी वाहनांचा पुरवठा करण्यात येणार आहे. यामध्ये असलेल्या पर्यायी उद्योगामध्ये मासळी सुकविण्यासाठीचे सौर ऊर्जेवर चालणारे यंत्र, मासेमारी धक्क्यांचे आधुनिकीकरण, मासळीची वाहतूक करण्यासाठी वाहने आदी मूलभूत सुविधा पुरविण्यात येणार आहेत. या गावांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या सागरी भागात अवैध मासेमारी रोखण्यासाठी तसेच सागरी सुरक्षेच्यादृष्टीने योग्य अशा आधुनिक नौका खरेदी करण्यात येणार आहेत. त्यामुळे अवैध मासेमारीला आळा बसून स्थानिक मच्छीमारांचे उत्पन्न वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.  योजनेच्या पहिल्या टप्प्यात रत्नागिरीत 13, ठाण्यात 6, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 8, रायगडमध्ये 7 आणि पालघरमधील 6 गावांचा समावेश करण्यात आला आहे.