Tue, Jul 23, 2019 06:16होमपेज › Konkan › बनावट गुणपत्रक फसवणूक प्रकरण; विद्यार्थ्यावर गुन्हा

बनावट गुणपत्रक फसवणूक प्रकरण; विद्यार्थ्यावर गुन्हा

Published On: Sep 10 2018 1:16AM | Last Updated: Sep 09 2018 9:10PMरत्नागिरी : प्रतिनिधी 

प्रथम वर्षामध्ये अनुत्तीर्ण असूनही द्वितीय वर्षाच्या प्रवेशासाठी उत्तीर्ण असल्याचे बनावट गुणपत्रक तयार करून महाविद्यालयाची फसवणूक केल्याप्रकरणी सुयश उदय शेट्ये (रा. आत्मबंधू आर्केड, मारुती मंदिर, रत्नागिरी) या विद्यार्थ्याविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीची ही घटना 17 ऑगस्ट 2018 रोजी शहरानजीकच्या मिरजोळे एमआयडीसी येथील फिनोलेक्स अ‍ॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नोलॉजी महाविद्यालयात घडली आहे. 

विद्यार्थी सुयश शेट्ये याच्याविरोधात महाविद्यालयाचे संजय बाबुराव कुलकर्णी  (46, रा.झाडगाव, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार, सुयश याने प्रथम वर्षामध्ये अनुत्तीर्ण असताना व्दितीय वर्षाच्या प्रवेशासाठी सेमीस्टर 1 चे पुनर्मूल्यांकनाचे बनावट गुणपत्रक महाविद्यालयात देवून महाविद्यालयाची आणि मुंबई विद्यापीठाची फसवणूक केली. मुंबई विद्यापीठाकडून गुणपत्रकांचे पुनर्मूल्यांकन करण्यात आल्यावर ही फसवूणक उघड झाली आहे. ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास महिला पोलिस उपनिरिक्षक चित्रा मढवी करत आहेत.