Wed, Apr 24, 2019 11:31होमपेज › Konkan › नेत्रावती एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड

नेत्रावती एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड

Published On: May 18 2018 1:17AM | Last Updated: May 17 2018 11:04PMरत्नागिरी : प्रतिनिधी

कोकण रेल्वे मार्गावर तिरुअंनतपूरम ते एलटीटी मुंबई अशी धावणार्‍या नेत्रावती एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही गाडी रत्नागिरी स्थानकात उभी करण्यात आली होती. अखेर दुसरे इंजिन बसवून सुमारे दीड तासानंतर ही गाडी मुंबईच्या दिशेने रवाना झाली. मुळातच ही गाडी 1 तास उशिराने धावत होती. त्यातच इंजिनमध्ये झालेल्या बिघाडामुळे प्रवाशांना तिष्ठत बसावे लागले.

केरळची राजधानी तिरुअंनतपूरम येथून सुटणारी 23 डब्यांची ही गाडी रत्नागिरी स्थानकावर सकाळी 9.05 वाजता येते. गुरुवारी ही गाडी नियमित वेळेपेक्षा एक तास उशिराने धावत होती. रत्नागिरी स्थानकात आल्यावर या गाडीच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. इंजिनिअर्सनी पाहणी केल्यावर हा बिघाड तत्काळ दुरुस्त करणे शक्य नसल्याने या गाडीला दुसरे इंजिन लावण्याचा निर्णय घेण्यात आला. अखेर हे इंजिन लावल्यानंतर पुढील प्रवासासाठी ही गाडी दुपारी 12.30 वाजता मार्गस्थ झाली. 

दरम्यान, रत्नागिरी स्थानकावरच इंजिन बिघडल्याने आणि दुसरे इंजिन उपलब्ध असल्याने या गाडीला आणखी उशीर झाला नाही. तसेच प्लॅटफॉर्म क्र. 1 वर ही गाडी उभी करण्यात आली होती. त्यामुळे या प्लॅटफॉर्मवर येणार्‍या गाड्या अन्य प्लॅटफॉर्मवर वळवण्यात आल्याने इतर रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक सुरळीत सुरू असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. मात्र, प्लॅटफॉर्म बदलामुळे प्रवाशांची एकच तारांबळ उडाली.