Wed, Mar 27, 2019 00:06होमपेज › Konkan › तटरक्षक दलाच्या विमानाचे यशस्वी उड्डाण

तटरक्षक दलाच्या विमानाचे यशस्वी उड्डाण

Published On: Aug 09 2018 10:27PM | Last Updated: Aug 09 2018 10:11PMरत्नागिरी : प्रतिनिधी

धावपट्टीच्या नूतनीकरणानंतर  रत्नागिरी विमानतळावर भारतीय तटरक्षक दलाच्या डॉर्नियर विमानाने प्रथमच यशस्वी लँडिंग केले. तटरक्षक दलाच्या पश्‍चिम क्षेत्राचे प्रमुख कमांडर महानिरीक्षक विजय डी. चाफेकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर हा प्रथमच रत्नागिरी दौरा केला. डॉर्नियर विमान उतरण्याचे व झेपावण्याचे यशस्वी प्रात्यक्षिक घेण्यात आले. सागरी सुरक्षिततेसाठी विमानतळ सज्ज झाले आहे.

सन 2015पासून धावपट्टीच्या नूतनीकरणासाठी चालू कामामुळे रत्नागिरी विमानतळ येथून विमान वाहतूक बंद करण्यात आली होती. यादरम्यान केवळ अत्यावश्यक वेळी हेलिकॉप्टर उड्डाणे चालू होती. हे काम सध्या पूर्ण झालेले असून त्यावर चाचणी उड्डाणे हाती घेण्यात येणार आहेत. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राच्या सागरी गस्तीसाठी तटरक्षक दलाची विमाने व हेलिकॉप्टर रत्नागिरी विमानतळ येथून नियमित भरारी घेतील. गुरुवारचे उड्डाण हे प्रथम चाचणी उड्डाण असल्यामुळे याला महत्त्व प्राप्त झाले होते. धावपट्टीच्या विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाल्यामुळे त्याची पाहणी करण्यासाठी व रत्नागिरी येथे स्वतंत्र तटरक्षक वायू अवस्थान कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने पाहणी करण्यासाठी तटरक्षक पश्‍चिम क्षेत्राचे प्रमुख कमांडर महानिरीक्षक व्ही. डी. चाफेकर यांनी रत्नागिरी विमानतळ येथे कार्यरत त्यांच्या भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरी या कार्यालयास  भेट दिली. 

यावेळी रत्नागिरी कार्यालयाने हाती घेतलेल्या सागरी सुरक्षा उपाय योजना, सागरी शोध व बचाव मोहिमा, समुदाय संवाद कार्यक्रम, प्रशिक्षण उपक्रम, प्रशासकीय इमारत, रहिवाशी सदनिका, भगवती येथे उभारले जाणारे जहाज दुरुस्ती केंद्र व जेट्टी, भाटे येथे उभारले जाणारे हॉवरपोर्ट, प्रस्तावित विमान हँगर, धावपट्टी विद्युतीकरण आदी सागरी सुरक्षिततेच्या दृष्टीने निर्माण केल्या जाणारी पायाभूत विकास कामे याबद्दल कमांडंट एस. आर. पाटील यांनी महानिरीक्षक चाफेकर यांना सविस्तर माहिती दिली. तसेच त्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन विमानतळाच्या आणि नवीन प्रशासकीय इमारतीच्या कामाचा आढावा घेतला. झाडगाव, भगवती बंदर व भाटे बीच येथील तटरक्षक दलाच्या भूखंडांवर जाऊन त्यांना आगामी काळात सुरु होणार्‍या प्रकल्पाचीही माहिती देण्यात आली. 

रत्नागिरी येथे सुरू असलेल्या विकासकामांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आणि रत्नागिरी हे लवकरच तटरक्षक दलाचे एक अद्ययावत व प्रमुख  तळ बनविण्यासाठी आवश्यक त्या सर्व कामांना प्रशासकीय मान्यता मिळण्याच्या हेतूने प्राथमिकता दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले. रत्नागिरी येथे कार्यरत असताना दलातील सैनिकांना भेडसावणार्‍या समस्यांबद्दल त्यांनी जाणून घेतले. तटरक्षक दलाच्या रहिवाशी सदनिका व सेना दलातील जवानांना दिल्या जाणार्‍या सर्व सोई सुविधा रत्नागिरी येथे लवकरात लवकर उभारण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी वायू अवस्थानाचे कमान अधिकारी कमांडंट ए. सी. दांडेकर, कमांडंट आचार्युलू, तांत्रिक अधिकारी उपसमादेशक सुनील चौहान, चिकित्सा अधिकारी प्रशांत, उप समादेशक अभिषेक करुणाकर आदी उपस्थित होते.