Thu, Apr 25, 2019 03:57होमपेज › Konkan › आरक्षणासाठी आयोगाचे नाटक बंद करा

आरक्षणासाठी आयोगाचे नाटक बंद करा

Published On: Jul 28 2018 11:01PM | Last Updated: Jul 28 2018 10:53PM
रत्नागिरी : प्रतिनिधी
मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा राज्यभर गाजत असतानाच रत्नागिरीतील खेडशी येथे काहीजणांकडून मराठा समाजाची सामाजिक व शैक्षणिक प्रश्‍नावली घेऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. हे सर्वेक्षण सरकारकडून होत आहे की खासगी संस्थांकडून याचा कोणताच उलगडा होत नाही. राज्याच्या मागासवर्गीय आयोगाकडून चुकीच्या पद्धतीने सर्वेक्षण होत असेल तर आयोगाचे नाटक बंद करा, असे परखड मत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस नीलेश राणे यांनी व्यक्त केले. 

गेल्या दोन दिवसांपासून हे सर्वेक्षण सुरू असून, सर्वेक्षण करणार्‍यांनाच आपण कोणाकडून हे सर्वेक्षण करत आहोत याची माहिती देता येत नाही. याची माहिती देताना राणे यांनी सांगितले की, सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गतवर्षी 28 मूकमोर्चे काढण्यात आले. त्यानंतर मराठा समाजाने वर्षभर वाट बघितली. काकासाहेब शिंदे यांनी आत्महत्या केल्यावर आता हा समाज पेटून उठला आहे. या समाजाने टोकाची भूमिका घेतली असून, मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला न्याय द्यावा. सन 2014 साली नेमलेल्या राणे समितीच्या अहवालावर आरक्षण मंजूर करावे.

खेडशी येथे आलेल्या व्यक्तींना सर्वेक्षण कसे करावे याचीसुद्धा माहिती नाही. मोबाईलवर नावांची यादी बघून ही माणसे गावात मराठा समाज कोठे आहे, याची विचारपूस करत आहेत. हे फॉर्म शासनाचे अधिकृत फॉर्म नाहीत, यावर शासनाचे कोणतेही सही, शिक्के नाहीत. साप चावल्यावर कोणाकडे जाता, नवसासाठी कोंबडा आणि बकर्‍याचा बळी देता का असे अचंबित करणारे प्रश्‍न विचारण्यात आले आहेत. याद्वारे मराठा समाजाची एकप्रकारे चेष्टाच केली जात आहे. हे प्रकार वेळीच थांबवावेत अन्यथा सर्वेक्षणासाठी या व्यक्ती गावात जातील पण गावातून पुन्हा बाहेर येणार नाहीत, असा इशाराही राणे यांनी यावेळी दिला.