Mon, Aug 19, 2019 18:30होमपेज › Konkan › चिपी विमानतळावरून शिवसेना-भाजपमध्ये वाद

चिपी विमानतळावरून शिवसेना-भाजपमध्ये वाद

Published On: Sep 07 2018 10:19PM | Last Updated: Sep 07 2018 10:19PMरत्नागिरी : प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिपी येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनावरून शिवसेना व भाजपमध्ये जुंपण्याची शक्यता आहे. शिवसेनेने 12 सप्टेंबर रोजी चिपी विमानतळावर विमान लँडिंग होणार असून, यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याचे जाहीर केले असले तरी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आ. प्रसाद लाड यांनी या विमानतळाचे उद्घाटन 12  सप्टेंबर रोजी न होता ते दिवाळीनंतरच होणार असल्याचे जाहीर केले. 

गणेशोत्सवापूर्वी या चिपी विमानतळावर विमान टेस्टिंगसाठी लँडिंग होणार असून यावेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू, खा. विनायक राऊत हे उपस्थित राहणार असल्याचे सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केले होते. यावेळी स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खा. नारायण राणे यांनी आपण या लँडिंगच्यावेळी उपस्थित राहणार असल्याचे म्हटले होते. त्याशिवाय याचे श्रेय शिवसेनेलाच मिळू नये यासाठी भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावेळी उपस्थित रहावे यासाठी प्रयत्न सुरू केले होते. 12 सप्टेंबरचे विमान लँडिंग  हे टेस्टिंगसाठी असले तरीदेखील हा एक इव्हेंट होण्याची चिन्हे दिसत होती.  यापूर्वी अगोदर दोन दिवस 10 सप्टेंबर रोजी आणखी एक विमान टेस्टिंगसाठी चिपी विमानतळावर उतरणार असल्याचे खा. विनायक राऊत यांनी सांगितले होते. 

अगोदरच नेमके टेस्टिंग कधी होणार? याबाबत संभ्रम निर्माण झाला असतानाच आता कोकणात भाजप संघटनेची जबाबदारी देण्यात आली आहे त्या आ. प्रसाद लाड यांनी विमानतळाचे उद्घाटन 12 सप्टेंबर रोजी न होता दिवाळी नंतर होईल, असे जाहीर केले आहे.  

गेली दहा वर्षे खा. नारायण राणे व सध्या केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी अत्याधुनिक विमानतळ उभे राहण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू ठेवले आहेत. त्यांच्या प्रयत्नाने या विमानतळाचे काम पूर्णत्वाला जात आहे. त्यामुळे विमानतळाच्या उद्घाटनाच्या तारखा केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या मंत्रालयाकडूनच जाहीर केल्या जाणार असल्याचे आ. प्रसाद लाड यांनी स्पष्ट केले.

 विमानतळाचे काही काम अपूर्ण असून दसरा किंवा दीपावलीला चिपी विमानतळाचे उद्घाटन होईल, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे चिपी विमानतळाच्या उद्घाटनावरून सेना-भाजपमध्ये जुंपल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आ. प्रसाद लाड यांनी विमानतळाचे उद्घाटन दिवाळी नंतर होणार असल्याचे म्हटले आहे; परंतु 10 व 12 सप्टेंबर रोजी नियोजित ट्रायल लँडिंग  होणार की नाही याबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे. 

आयआरबी या कंपनीकडून 10 व 12 सप्टेंबर रोजी लँडिंग  करण्याच्यादृष्टीने युद्धपातळीवर काम सुरू आहे. त्याचवेळी आ. प्रसाद लाड यांनी काम अपुरे असल्याचे म्हटल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.