Wed, Aug 21, 2019 19:37होमपेज › Konkan › रत्नागिरी रेल्वे स्थानकात बॉम्बसदृश वस्तू सापडली अन्....

रत्नागिरी रेल्वे स्थानकात बॉम्बसदृश वस्तू सापडली अन्....

Published On: May 25 2018 11:34PM | Last Updated: May 25 2018 10:22PMरत्नागिरी : प्रतिनिधी

 कोकण रेल्वेच्या एमआयडीसी येथील कार्यालयात बॉम्बसदृश वस्तू सापडल्याने शुक्रवारी सकाळी एकच खळबळ उडाली. कोकण रेल्वेच्या कार्यालयातील सुरक्षा रक्षकांनी बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना दिली. अवघ्या काही सेकंदात डीवायएसपी इंगळे आणि ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी घटनास्थळी धाव घेतली. तत्काळ बॉम्ब शोध आणि नाशक पथकासह श्‍वानपथक आणि रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशमन यंत्रणेलाही पाचारण करण्यात आले. 

शुक्रवारी सकाळी 11 वा. कोकण रेल्वेच्या एमआयडीसीतील कार्यालयाच्या पार्किंग झोनमध्ये सुरक्षा रक्षकांना बेवारस खोका दिसून आला. सुरक्षारक्षकांनी खोक्याची पाहणी केली असता खोक्यामध्ये आक्षेपार्ह वस्तु आढळून आल्या. सुरक्षा रक्षकांनी तत्काळ याची माहिती पोलीस यंत्रणेला दिली. अवघ्या दहा मिनिटांमध्ये रत्नागिरीचे डीवायएसपी इंगळे आणि ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते आपल्या कर्मचार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. अनोळखी बॉक्सची पाहणी केल्यानंतर बॉम्ब शोध आणि नाशक पथकासह अग्निशमन यंत्रणा आणि श्‍वान पथकालाही पाचारण करण्यात आले. सुरूवातीला श्‍वान पथकाच्या मदतीने तपासणी करण्यात आली. परंतु, या  पथकाच्या हाती काही ठोस लागले नाही. यानंतर बॉम्ब शोध आणि नाशक पथकाच्या कर्मचार्‍यांनी अद्ययावत यंत्रणेच्या माध्यमातून बॉक्समधील वस्तुंची तपासणी सुरू केली. या दरम्यान कोकण रेल्वेचे कार्यालय सर्वसामान्यांसाठी बंद ठेवण्यात आले होते. कार्यालयातील कर्मचारी देखील बॉम्ब असल्याच्या भितीने पुरते घाबरून गेले होते. अखेर बॉम्ब शोध आणि नाशक पथकाच्या कर्मचार्‍यांनी पार्किंग झोनमध्ये सापडलेल्या बॉक्समधील वस्तुची तपासणी केल्यानंतर बॉक्समधील वस्तू बॉम्ब नसल्याचे उघड झाले. आपत्कालीन परिस्थीतीत पोलीस यंत्रणेसह अन्य यंत्रणा कशा पध्दतीने कार्यरत असतात यासाठी घेण्यात आलेले मॉकड्रील असल्याचे समजताच  कोकण रेल्वेच्या कर्मचार्‍यांसह सर्वांनीच सुटकेचा नि:श्‍वास टाकला.