Tue, Mar 26, 2019 01:32होमपेज › Konkan › ९०७ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त

९०७ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त

Published On: Jul 21 2018 10:45PM | Last Updated: Jul 21 2018 10:39PMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

येथील नगरपरिषदेच्या विशेष पथकाने प्लास्टिक आणि थर्माकोल साहित्य जप्त करण्याचा शनिवारी विक्रमच केला. तब्बल 907 किलोच्या प्लास्टिक पिशव्यांसह  प्रतिबंधित प्लास्टिकच्या विविध वस्तू जप्त केल्या. पथकाकडून गेल्या तीन दिवसांत सुमारे 2 हजार किलोपर्यंतचे प्लास्टिक आणि थर्माकोल जप्त करण्यात आले.

आरोग्य विभागाच्या प्रमुख श्रीमती शिरवळकर यांच्यासह नरेंद्र आखाडे, जितेंद्र विचारे, किरण मोहिते यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुरुवारपासून धडक कारवाई सुरू केली. साठा करून होलसेल विक्री करणार्‍या व्यावसायिकांना लक्ष्य करण्यात आले. शहरातील राधाकृष्ण नाका, धनजीनाका आणि झारणी रोड परिसरात गेल्या तीन दिवसांत कारवाई करण्यात आली. शनिवारच्या राधाकृष्ण नाका येथील कारवाईत तब्बल 907 किलो प्लास्टिक पिशव्यांसह गणेशोत्सव सजावटीचे व इतर डिश, कप आदी वस्तू जप्त करण्यात आल्या.

कारवाई करणारे पथक आल्याचे समजताच अनेक दुकाने रात्र होण्यापूर्वीच पटापट बंद केली जात आहेत. मात्र, ही कारवाई रोजच्या रोज सुरू असल्याने कोणाचीही सुटका होईल, याची शक्यता कमी आहे. दरम्यान, ज्या दुकानांमधून प्रतिबंधित माल जप्त केला जात आहे, त्या दुकानदारांकडून पुन्हा या वस्तूंची विक्री केली जाणार नाही, असे घोषणापत्र घेतले जात आहे.