Fri, May 24, 2019 21:38होमपेज › Konkan › पर्यटनासाठी ‘सीआरझेड’मधील ७० ठिकाणे निश्‍चित

पर्यटनासाठी ‘सीआरझेड’मधील ७० ठिकाणे निश्‍चित

Published On: Feb 02 2018 10:47PM | Last Updated: Feb 02 2018 9:36PMरत्नागिरी : प्रतिनिधी

कोकणात पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी शासनाने  आपल्या विधायक नियमांना मुरड घालून किनारी भागात वसलेल्या पर्यटनस्थळांसाठी सीआरझेड   (सागरी अधिनियमन क्षेत्र) चे नियम शिथिल, तर काही भागांत ते रद्द करण्याचीही तयारी दाखविली आहे. त्यासाठी कोकणातील चारही प्रमुख जिल्ह्यांतील प्रशासनांना प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

कोकणला लाभलेल्या 720 कि.मी.च्या सागरी किनार्‍यावर अनेक पर्यटनस्थळे ‘सीआरझेड’मुळे  दुर्लक्षित आहेत. किनारी क्षेत्रांचा शाश्‍वत विकास करणे आणि सागरावरील स्थानिकांचे जीवनमान सुधारणे तसेच त्यांच्या संपत्तीची आणि जीविताची सुरक्षा हा मूळ नियमावलीमागील उद्देश होता.  सागरी क्षेत्रासाठी एकाच प्रकारचे व्यवस्थापन या नियमावलीत सुचविण्यात आले होते. यामुळे त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना अनेक अडथळे आले आणि त्यावर मात करण्यासाठी गेल्या 20 वर्षांत या नियमावलीत 25 वेळा दुरुस्ती करण्यात आली.

दरम्यान, प्रत्येक ठिकाणच्या भौगोलिक, सामाजिक, आर्थिक परिस्थितीचा विचार करून स्थानिकांना हितावह ठरेल, अशा समवर्ती सागरतटीय नियमन क्षेत्र नियमावलीची अत्यंत आवश्यकता होती. त्यानुसार या ठिकाणांच्या समुद्रकिनारी भागातील ‘सीआरझेड’ रद्द करण्याची तयारी शासनाने दर्शवली आहे. पर्यावरण मंत्रलयानेही याबाबत सकारत्मकता दर्शविली आहे.

जिल्हा प्रशासनांना अशा किनारी पर्यटस्थळांचे प्रस्ताव पाठविण्याचे सूचित केले आहे. या प्रस्तावाद्वारे किनारी भागात गोव्याच्या धर्तीवर पर्यटनाच्या सुविधा उभारताना त्यामध्ये काही   पायाभूत बांधकामेही करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. ही बांधकामे करण्यासाठी ‘सीआरझेड’ची अट असल्याने अशा स्थळांना ‘सीआरझेड’मधून वगळण्यात येणार आहे. तसेच ‘सीआरझेड’चे नियम शिथिल करताना तेथे सुरक्षिततेच्या उपाययोजनाही प्रस्तावित करण्यात येणार आहेत.