रत्नागिरी : विशेष प्रतिनिधी
अन्न सुरक्षा कायद्याने प्रतिबंधित असलेल्या अन्नपदार्थांची विक्री करणार्या संशयित व्यावसायिकांवर गेल्या 15 दिवसांत जिल्ह्यात 29 ठिकाणी छापे मारण्यात आले. यामध्ये 38 लाख 23 हजार रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला. यामध्ये गुटखा, सुगंधी तंबाखू-सुपारी, पान मसाल्यांचा समावेश आहे. यामध्ये रत्नागिरी शहरात सात ठिकाणी छापे मारण्यात आले. त्याचबरोबर दोन दुकाने सील करण्यात आली असून, 16 प्रकरणे न्यायालयात फौजदारी खटले दाखल करण्यात आले आहेत.
अन्न सुरक्षा आयुक्तांच्या निर्देशानुसार रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांमध्ये अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्यांनी विशेष मोहीम राबवली. या छापे सत्रात मानवी आरोग्यास घातक असलेल्या गुटखा, पान मसाला, सुगंधी सुपारी-तंबाखू, मावा, खर्रा व तत्सम अन्नपदार्थांचा शोध घेण्यात आला. अशा पदार्थांवर बंदी असून, त्याची विक्री, वाहतूक, साठा करणे बेकायदेशीर आहे. या कारवाईमध्ये 29 ठिकाणी छापे मारण्यात आले. विशेष पथके स्थापन करून ही धडक कारवाई करण्यात आली.
रत्नागिरी शहरातही सात व्यावसायिकांकडे गुटखा, पानमसाला असे प्रतिबंधित पदार्थ सापडले. यातील दोन दुकाने सील करण्यात आली आहेत. शहरात 18 हजार 680 रूपयांचा साठा मिळून आला. इतर छाप्यांमध्ये मिळालेला माल असा एकूण 38 लाख 23 हजार 538 रूपयांचा प्रतिबंधित अन्नसाठा जप्त करण्यात आला. या कारवाईमध्ये अन्न सुरक्षा अधिकारी राजन बा. साळवी, दीप्ती हरदास, प्रियंका वाईकर आदींचा सहभाग होता.
जिल्ह्यात यापुढेही अशीच कारवाई सुरू राहणार आहे. प्रतिबंधित असलेल्या अन्नपदार्थांचा व्यवसाय करू नये. कारवाईत असे अन्नपदार्थ सापडले तर त्या व्यवसायाची जागा, वाहन सीलबंद करण्यात येणार असल्याचे रत्नागिरीचे सहाय्यक आयुक्त (अन्न) सय्यद इम्रानहाश्मी इब्राहीमहाश्मी यांनी सांगितले. दरम्यान, काही प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या नमुन्यांचे अहवाल येणे बाकी आहे. हे अहवाल आल्यानंतर संबंधितांवर खटले दाखल करण्यात येणार असल्याचे अन्न सुरक्षा अधिकारी राजन साळवी यांनी सांगितले.