Mon, Jun 24, 2019 17:29होमपेज › Konkan › पोलिस भरतीसाठी ३४४१ उमेदवारांनी दिली लेखी परीक्षा

पोलिस भरतीसाठी ३४४१ उमेदवारांनी दिली लेखी परीक्षा

Published On: Apr 08 2018 10:41PM | Last Updated: Apr 08 2018 9:49PMरत्नागिरी : प्रतिनिधी

जिल्हा पोलिस दलातील रिक्‍त असलेल्या 195  पदांसाठी रविवारी लेखी परीक्षा घेण्यात आली. एकूण 3702 उमेदवारांपैकी 3441 उमेवारांनी येथील छ. शिवाजी स्टेडियम येथे लेखी परीक्षा दिली. मैदानी चाचणी उत्तीर्ण झालेल्या 3702 उमेदवारांपैकी एका जागेसाठी 15 प्रमाणे 3702 उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलावण्यात आले होते. त्यापैकी 261  उमेदवार लेखी परीक्षेला गैरहजर राहिले तर उर्वरित 3441 उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली. 

सकाळी 9.45 वाजता परीक्षेला सुरुवात झाली. ती दुपारी 11.15  वाजता संपली. त्यानंतर वरिष्ठ अधिकार्‍यांमार्फत पेपर तपासणीचे काम सुरु करण्यात आले आहे. लेखी परीक्षेच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस अधीक्षक प्रणय अशोक, अप्पर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली 3 उपविभागीय अधिकारी, 15 पोलिस निरीक्षक, 60 पोलिस उपनिरीक्षक, 400 पोलिस कर्मचारी छत्रपती शिवाजी स्टेडियम परिसरात तैनात करण्यात आले होते.

पोलिस भरतीसाठी किमान 12 वी उत्तीर्ण असणे बंधनकारक होते. 12 वी उत्तीर्ण उमेदवारांबरोबरच उच्चशिक्षित उमेदवारही भरतीसाठी आले होते. दरम्यान, लेखी परीक्षेला आलेल्या अनेक उमेदवारांनी  पॅड, पेनही आणले नसल्याचे पुढे आले. लेखी परीक्षेसाठी मैदानावर गेल्यानंतर पेन आणला नसल्याचे अनेक उमेवारांच्या लक्षात आले. पोलिस दलात दाखल होण्यासाठी आलेल्या उमेदवारांच्या पूर्वतयारीमुळे ते पोलिस दलात येण्यास योग्य आहेत का, असाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

रविवारी असलेल्या या परीक्षेमुळे शनिवारी रात्री  उमेदवारांसह त्यांचे नातेवाईक  रत्नागिरी शहरात दाखल झाले होते. शहरात हॉटेल, लॉज येथे राहण्याची व्यवस्था न झाल्याने उमेदवारांना रस्त्यावरच रात्र काढावी लागली. अनेक महिला उमेदवारांनाही राहण्यासाठी जागा उपलब्ध न झाल्याने त्यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांनी रात्र जागून काढली.