Sun, Jul 21, 2019 10:31होमपेज › Konkan › चक्रीवादळ आसरा केंद्रासाठी 3 कोटींचा निधी

चक्रीवादळ आसरा केंद्रासाठी 3 कोटींचा निधी

Published On: Aug 05 2018 9:59PM | Last Updated: Aug 05 2018 9:59PMरत्नागिरी : प्रतिनिधी

जागतिक बँक सहाय्यित राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प राज्याच्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत रत्नागिरीतील सैतवडे येथे आसरा केंद्र उभारण्यासाठी 2 कोटी 99 लाख 33 हजार 700 रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

रत्नागिरी  किनारपट्टीवर असलेल्या लोकांचे चक्रीवादळापासून संरक्षण करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चक्रीवादळ निवारण केंद्र उभारण्यात येणार असून यासाठी सैतवडे गावाची निवड झाली आहे. अरबी समुद्रावर विसावलेल्या रत्नागिरीसह सर्वच किनारपट्टीवरील जिल्ह्यांना चक्रीवादळाचा सातत्याने धोका असतो. गतवर्षी डिसेंबरमध्ये किनारपट्टीवरूनच पुढे सरकलेल्या ओखी वादळामुळे किनारपट्टीवरील रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण झाला होता. नऊ वर्षांपूर्वी  नोव्हेंबरमध्ये झालेल्या फयान वादळाने रत्नागिरीची किनारपट्टी नेस्तनाबूत केली होती. अशा वेळी किनारपट्टीवरील रहिवाशांना कुठे स्थलांतरित करायचे हा मोठा प्रश्‍न स्थानिक प्रशासनासमोर उभा राहतो. याच प्रश्‍नावर ओरिसा येथे अभ्यास करण्यात आला. तेथील सुपर सायक्लोनच्या धोक्यामुळे तेथे चक्रीवादळ निवारण केंद्राची एका विशिष्ट पद्धतीने बांधणी करण्यात आली आहे. इतरवेळी हे केंद्र अन्य सामाजिक कामासाठी, उपक्रमांसाठी वापरले जाते; परंतु जेव्हा चक्रीवादळाचा धोका निर्माण होतो त्यावेळी या केंद्राचा वापर सुरक्षा केंद्र म्हणून करण्यात येणार आहे. या केंद्रात किनारपट्टीवरील लोकांना स्थलांतरित केले जाणार आहे. याच केंद्रात त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

याच पार्श्‍वभूमीवर देशातील किनार्‍यावरील सर्वच राज्यात व तेथील जिल्ह्यांमध्ये अशी निवारण केंद्र उभारण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पातंर्गत घेण्यात आला आहे. यासाठी रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे या गावाची निवारण केंद्र उभारण्यासाठी निवड केली आहे.

या धोके निवारण कार्यक्रमांतर्गत तीन टप्प्यामध्ये काम चालणार आहे. त्यामध्ये निवारण केंद्र उभारणीसोबतच भुयारी विजेच्या केबल टाकणे आणि खारभूमी बंधार्‍यांची क्षमता बांधणी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.