होमपेज › Konkan › रत्नागिरीकरांचा २७ पासून मांडवी पर्यटन महोत्सव

रत्नागिरीकरांचा २७ पासून मांडवी पर्यटन महोत्सव

Published On: Apr 10 2018 10:33PM | Last Updated: Apr 10 2018 9:22PMरत्नागिरी : प्रतिनिधी

शहरात पर्यटन वाढीस चालना मिळावी यासाठी मांडवी पर्यटन संस्थेतर्फे सलग दुसर्‍या वर्षी मांडवी पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मांडवी परिसर पर्यटन विकास सेवा सहकारी संस्था, रत्नागिरी आणि श्रीदेव भैरी देवस्थान ट्रस्टच्या सहाय्याने दि. 28, 29, 30 एप्रिल व 1 मे रोजी हा महोत्सव होणार असल्याची माहिती मांडवी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजीव कीर यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

दि. 28 एप्रिल रोजी सायंकाळी 

मांडवी भैरी मंदिर ते मांडवी समुद्र किनारा अशी शोभायात्रा निघणार आहे. सायं. 6 वा. वाळूशिल्प, खाद्य महोत्सवाचे उद्घाटन होऊन मांडवी पर्यटन महोत्सवाला सुरुवात होणार आहे. या महोत्सवामध्ये स्थानिक मच्छीमार मुलांच्या मदतीने पर्यटकांना होडीने पारंपरिक मासेमारीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे. तसेच मासे पकडण्याचा रापण हा प्रकार पर्यटकांना सहभागी होऊन अनुभवता येणार आहे. घोडागाडी रपेट, फनफेअर असे अनेक लहान मुलांसाठी मौजमस्तीचे खेळ मांडवी किनार्‍यावर आयोजित करण्यात येणार आहेत.

पर्यटकांना कोकणी खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी खेकडे, कोळंबी, कालवे, मटण वडे, कोंबडी वडे, भाकरी, बिर्याणीबरोबरच जांभूळ, करवंद, तोरणे, काजू आदी रानमेव्याची चव चाखायला मिळणार आहे. महोत्सवात खास आकर्षण असेल ते महाबळेश्‍वरचे सुप्रसिद्ध स्ट्रॉबेरी आईस्क्रीम, आरोग्यवर्धक नीरा व स्ट्रॉबेरी वाईन हे आहे.

शनिवार दि.28 एप्रिल रोजी सायं.7.00 वाजता माहेरवाशिणींचा मेळावा व होम मिनिस्टर स्पर्धा, रविवार दि.29 एप्रिल रोजी मराठी व हिंदी गीतांचा ऑर्केस्ट्रा, सोमवार दि.30 एप्रिल रोजी फॅशन शो, स्थानिक लोककला आणि गाण्याचे कार्यक्रम, मंगळवार दि.1 मे रोजी वेसावकर आणि मंडळी मुंबई यांचा ‘दर्याचा राजा’ मराठी गीतांचा  कार्यक्रम होणार आहे.या पत्रकार परिषदेला संयोजन समितीचे अध्यक्ष रुपेंद्र शिवलकर, नगरसेविका रशिदा गोदड, दया चवंडे, बंटी कीर, राजन शेट्ये, बिपीन शिवलकर आदी उपस्थित होते.