Wed, Jul 17, 2019 12:00होमपेज › Konkan › २१ धरणे तुडुंब 

२१ धरणे तुडुंब 

Published On: Jul 11 2018 10:21PM | Last Updated: Jul 11 2018 10:21PMरत्नागिरी : प्रतिनिधी

जून महिन्यात दोनवेळा पुनरागमन करणारा पाऊस जुलैमध्ये पाऊसफुल्ल झाल्याने जिल्ह्यातील तीन मध्यम प्रकल्पांसह 21 धरणे तुडुंब भरली आहेत. त्यांपैकी  दोन मध्यम पाटबंधारे प्रकल्पांतून विसर्ग नोंदविण्यात आला आहे. जिल्ह्यातील प्रमुख नद्यांनीही इशारा पातळी गाठली असून, पावसाची वाटचाल संयमी असल्याने या नद्यांनी  पूररेषा ओलांडण्याची केलेली तयारी त्यामुळे ओसरली. 

बिगर मोसमीने प्रारंभी झोडपल्यानंतर मोसमी पाऊस सात जूनपासून जिल्ह्यात सक्रिय झाला. मात्र, जूनमध्येच पहिल्या पंधरवड्यात गायब झालेला पाऊस पुन्हा सक्रिय झाला. त्यानंतर जूनच्या शेवटी ओसरलेल्या पावसाने आता जुAलैमध्ये सातत्य ठेवल्याने जिल्ह्यातील धरणांचा जलस्तर वाढला. तर नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ झाली.
जिल्ह्यात आतापर्यंत 1800 मि. मी.च्या सरासरीने  तब्बल 17 हजार मि.मी.ची मजल गाठली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तीन मध्यम प्रकल्पांसह 21 मध्यम प्रकल्पांचा जलसाठा 100 टक्के झाला आहे. त्यापैकी दोन मध्यम प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्याची नोंद करण्यात आली असून 21 धरणांनी ओव्हर फ्लोचा जलस्तर गाठला आहे. जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पातळीतही वाढ झाली असून गेल्या आठवड्यात जगबुडी आणि वाशिष्ठीने धोका पातळी ओलांडल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती. मात्र, पावसाचा जोर मध्यंतरी कमी झाल्याने पूरस्थिती ओसरली. तरीही राजापूर तालुक्यात अर्जुनाचे पात्र अद्यापही धोका पातळीवर असल्याने येथील बाजारपेठ पाण्याखाली जाण्याची भीती आहे. जिल्ह्यातील जगबुडी,  वाशिष्ठी, काडळी कोदवली आणि बावनदी या नद्या आता इशारा पातळीकडे झेपावू लागल्या आहेत.