Thu, Nov 15, 2018 20:21होमपेज › Konkan › जिल्ह्यातील १०६ पाणी नमुने दूषित

जिल्ह्यातील १०६ पाणी नमुने दूषित

Published On: Jun 30 2018 10:54PM | Last Updated: Jun 30 2018 10:20PMरत्नागिरी : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेतील जिल्हा पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत दर महिन्याला पाण्याची तपासणी प्रयोगशाळेत केली जाते. एप्रिल आणि मे महिन्यांत पावसाळापूर्व घेण्यात आलेल्या तपासणीत 3720 नमुन्यांपैकी 106 ठिकाणचे पाणी नमुने दूषित आढळले आहेत. टीसीएल पावडरचा वापर करून हे पाणी शुद्ध करण्यात आले आहे.

जिल्ह्यात स्वच्छतेला फार महत्त्व दिले जात आहे. येथील जनतेमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृतीही मोठ्या प्रमाणात केली जात आहे. तरीही काही पाण्याचे स्त्रोत दूषित होताना दिसत आहे. आरोग्य यंत्रणेकडून पाण्याचे नमुने गोळा करून त्याची दरमहा तपासणी केली जाते. जिल्ह्यात मंडणगड तालुक्यात 408, दापोलीत 875, खेड 1003, गुहागर 773, चिपळूण 1239, संगमेश्‍वर 973, रत्नागिरी 756 लांजा 706 आणि राजापूर तालुक्यात 1055 असे जिल्ह्यात 7 हजार 788 पाण्याचे स्त्रोत आहेत.  यातील काही पाण्याचे नमुने दर महिन्याला प्रयोग शाळेत तपासले जातात. यापैकी एप्रिल व मे महिन्यात मंडणगड तालुक्यात तपासणीसाठी प्राप्त झालेल्या 175 नमुन्यांपैकी 3, दापोलीत 404  नमुन्यांपैकी 3, खेडमध्ये 384 नमुन्यांपैकी 7, गुहागरमध्ये 471 पैकी 12, चिपळूणमध्ये 681 पैकी 36, संगमेश्‍वरमध्ये 453 पैकी 8, रत्नागिरीतील 415 पैकी 26, लांजातील 317 पैकी 2 तर राजापूर तालुक्यातील 420 पैकी 9 पाणी नमुने दूषित आढळले आहेत. दोन महिन्यातील दूषित पाण्याची टक्केवारी 2.85 एवढी आहे.

दूषित पाणी पिल्याने आजारांना सामोरे जावे लागते. जुलाब, उलटी, टायफॉइड, गॅस्ट्रो, विषाणू, जीवाणूंचे आजार, जंतूची वाढ यांसारखे आजार होतात. जलजन्य आजारांमुळे पोटांचे विकार बळावतात. जलजन्य आजारांमुळे गावांमध्ये साथ सुरू होण्याची भीतीदेखील असते. प्रशासनाने हा धोका ओळखून वेळीच पावले उचलली आहेत. पाण्याच्या शुद्धतेसाठी टीसीएलचा वापर प्रामुख्याने करण्यात आला असून, हे पाणी शुद्ध करण्यात आले आहे. पावसाळ्यात नागरिकांना पाणी उकळून थंड केलेले पाणी प्यावे, असे आवाहनही पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.