होमपेज › Konkan › ‘आर्ट सर्कल’च्या कलाजत्रेत दुर्मीळतेचे दर्शन

‘आर्ट सर्कल’च्या कलाजत्रेत दुर्मीळतेचे दर्शन

Published On: Jan 27 2018 11:22PM | Last Updated: Jan 27 2018 11:17PMरत्नागिरी : प्रतिनिधी

आर्ट सर्कलच्या कला संगीत महोत्सवात आयोजित कलाजत्रेत दुर्मीळ पक्षी, प्राणी यांची छायाचित्रे तसेच देशविदेशातील नाणी, मातीची भांडी यांचे दर्शन होत आहे. या कला जत्रेचे उद्घाटन ज्येष्ठ छायाचित्रकार गणेश खवळे यांच्या हस्ते करण्यात आले. या दालनांमध्ये ‘लेन्स आर्ट’ या संस्थेतर्फे कोकणात आढळणार्‍या दुर्मीळ पक्षांच्या छायाचित्रांची विभागवार मांडणी करून प्रदर्शन मांडण्यात आले आहे. एकूण 190 पक्षांची छायाचित्रे मांडण्यात आली असून, त्यामध्ये कोकणात आढळणार्‍या 184 प्रजातींच्या पक्षांचा समावेश आहे.

चिन्मय बेर्डे याने देश-विदेशातील दुर्मीळ 461 नाण्यांची मांडणी केली आहे. देवरूखच्या प्रितेश मांगले याने  पुठ्ठ्यापासून बनवलेल्या विविध कलाकृतींची मांडणी केली आहे. याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांची रंगभ्रमंती चित्रांच्या माध्यमांतून अनुभवायला मिळत आहे. शहरातील पटवर्धन हायस्कूलच्या चित्रकलेच्या विद्यार्थ्यांनी निसर्गात जाऊन काढलेली विविध चित्रे खूपच बोलकी ठरत आहेत. फाटक प्रशालेतील विद्यार्थ्यांनी साकारलेल्या चित्रांनाही स्वतंत्र दालन दिले आहे. ॠग्वेद जाधव आणि प्रतीक त्रिभुवणे यांनी साकारलेली चित्रे मन मोहून घेत आहेत. तसेच देवरूखच्या डी-कॅड या कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची कलाकारी आकर्षण आहे.

रत्नागिरीतील अंतरा खवळे हिच्या ‘मोहर’ या संस्थेतर्फे कपड्यांपासून बनविलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीही करण्यात येत आहे. तरुणांच्या आवडीचे ‘टॅटू’ काढण्याची सुविधाही या कलाजत्रेत उपलब्ध 
आहे. रत्नागिरीतील नागरिक तसेच पर्यटकांचीही हे प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी होत आहे. कलाकृतीचे हे प्रदर्शन पाहून सारेच भारावून जात आहेत. हे प्रदर्शन 28 पर्यंत सुरू राहणार आहे.