होमपेज › Konkan › रत्नागिरीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

रत्नागिरीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Published On: May 21 2018 1:18AM | Last Updated: May 21 2018 1:18AMरत्नागिरी : प्रतिनिधी

रत्नागिरीतील कोकणनगर परिसरातील अल्पवयीन मुलगी अलोरे-चिपळूण येथे आपल्या आजोळी गेली असता तिच्यावर तेथील एका वृद्धाने बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तो अलोरे पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

सुर्‍या (वय 55, रा. वालोटी वरचीवाडी, अलोरे, चिपळूण) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आजीने शनिवारी रात्री रत्नागिरी शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार पीडित मुलगी गेले 6 महिन्यांपासून आजोळी राहत होती. उन्हाळी सुट्टी असल्याने तिच्या आजीने तिला रत्नागिरीला आणले होते. 

रत्नागिरीत आल्यावर तिची प्रकृती बरी नसल्याने आजीने तिला डॉक्टरांकडे नेऊन औषधोपचार केले. परंतु, तरीही ती काहीही खात नव्हती तसेच वारंवार पोट दुखत असल्याची तक्रारही करीत होती. दरम्यान, आजीने तिला विश्‍वासात घेऊन अधिक चौकशी केली. तेव्हा तिने एप्रिल महिन्यात ती अलोरे येथे मैत्रिणीकडे खेळायला जात असताना शेजारी राहणार्‍या ‘सुर्‍या’  नावाच्या आजोबांनी तिला बोलावून बाजूच्या शौचालयात नेत बलात्कार केल्याची माहिती दिली. तसेच तिला मारहाण केल्याची माहितीही तिने आजीला दिली. 

त्यानुसार तिच्या आजीने तातडीने रत्नागिरी शहर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. याबाबत सुर्‍या नामक वृद्धावर बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 3,4,8 नुसार गुन्हा दाखल करुन शून्य नंबरने तो चिपळूणमधील अलोरे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला 
आहे.