Thu, Jul 18, 2019 04:33होमपेज › Konkan › जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात

जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात

Published On: Jun 16 2018 10:46PM | Last Updated: Jun 16 2018 10:36PMरत्नागिरी : प्रतिनिधी

महिनाभर रोजे अर्थात उपवास केल्यानंतर शनिवार दि. 16 जून रोजी जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी एकमेकांच्या घरी जाऊन गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या. खा. विनायक राऊत, आ. उदय सामंत, नगराध्यक्ष राहुल पंडित यांनीही मुस्लिम बांधवांना गुलाबपुष्प देत ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या.

रमजानचा महिना हा जगभरातील मुस्लिम बांधवांसाठी पवित्र महिना मानला जातो. रमजान हा इस्लामिक चांद्र पंचांगातील नववा महिना आहे. या काळात सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उपवास करुन रोजा पाळला जातो. 

महिनाभर रोजे पाळून इंद्रिये आणि मनावर संयम ठेवण्याचा आणि बंधुत्वाचा संदेश देण्यात येतो. शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजून 35 मिनिटांनी चंद्र दिसल्याने शाही इमामांनी देशातील सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. दिल्लीतील जामा मशिदीच्या शाही इमामांनी शुक्रवारी चंद्र दर्शन झाल्यावर ईद उल फितर शनिवारी साजरी होणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार शनिवारी सर्वत्र ईद साजरी करण्यात आली.

रमजान हा इस्लाम दिनदर्शिकेतला नववा महिना आहे. ही दिनदर्शिका चंद्रकला लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. जेव्हा हजरत मुहम्मद पैगंबर मक्केहून मदिनेला गेले तेव्हापासून इसवी सन पूर्व 622 मध्ये हिजरी दिनदर्शिका सुरु करण्यात आली. शिरकुर्मा हा खास गोड पदार्थ रमजानच्या निमित्ताने तयार केला जातो. तसेच बिर्याणी, मटण यांसह विविध लज्जतदार पदार्थ घरोघरी तयार करण्यात आले होते. 

सकाळी 10 वाजता ठिकठिकाणच्या मशिदीत ईदनिमित्त खास नमाजपठणासाठी लाखो मुस्लिम बांधव सहभागी झाले. ‘ईद उल फित्र’ निमित्त जिल्हाभरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. शुभेच्छा आणि भेटवस्तूंची देवाण-घेवाण करताना मुस्लिम बंधू- भगिनींच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता.