Sun, Jul 21, 2019 16:14
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › जिल्ह्यातील बेघरांना घराची प्रतीक्षाच

जिल्ह्यातील बेघरांना घराची प्रतीक्षाच

Published On: Jan 07 2018 2:02AM | Last Updated: Jan 06 2018 9:56PM

बुकमार्क करा
आरवली : वार्ताहर

रमाई आवास योजनेंतर्गत 7 हजार 883 कुटुंबे घरकुलांच्या प्रतीक्षेत आहेत. चालू आर्थिक वर्षात अडीच हजार घरकुले बांधण्याचे उद्दिष्ट असताना आतापर्यंत केवळ 303 घरकुलांना ऑनलाईन मंजुरी देण्यात आली आहे़  त्यामुळे बेघरांना घराची प्रतीक्षाच करावी लागत आहे.

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांना त्यांच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे स्वत:च्या उत्पन्नातून पक्के घर बांधणे शक्य होत नाही. ग्रामीण भागामध्ये बहुतांशी अनुसूचित जातीचे व नवबौद्ध लोक हे कच्च्या घरांमध्ये राहतात. नोकरीसाठी ग्रामीण भागातील बहुतांश लोक हे शहराकडे आलेले आहेत.
शहरातील वाढत्या किमतीमुळे तेथे ते स्वत:चे घर घेऊ शकत नाहीत. पर्यायाने त्यांना झोपडपट्टीमध्ये रहावे लागते. ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध लोकांचे राहणीमान उंचवावे व त्यांच्या निवार्‍यांचा प्रश्न सुटावा यासाठी या योजनेंतर्गत ग्रामीण व शहरी भागामध्ये त्यांच्या स्वत:च्या जागेवर अथवा कच्च्या घरांच्या ठिकाणी पक्के घर बांधून देण्यात येते.

रमाई आवास योजनेंतर्गत ग्रामीण भागातील घरकुलांना 70 हजार रुपये अनुदान दिले जात होते. हे अनुदान घरकुल बांधण्यासाठी अपुरे पडत असल्याने शासनाने त्यामध्ये वाढ करुन आता ते 1 लाख 20 हजार रुपये केले आहे. रमाई आवास योजनेसाठी सुमारे 9,115 प्रस्ताव आले होते. त्यापैकी 7,883 प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत़
रमाई आवास योजनेंतर्गत सन 2017-18 या आर्थिक वर्षात 2 हजार 500 घरकुलांचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. त्यांपैकी 303 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. रमाई आवास योजनेंतर्गत 7 हजार 580 घरकुलांचे प्रस्ताव अजून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे या कुटुंबांना आणखी किती वर्षे घरकुलांसाठी प्रतीक्षा करावी लागणार, असा प्रश्न आता विचारला जात आहे. 

जिल्हाभरातून घरकुलांसाठी 9,115 प्रस्ताव ग्रामपंचायतींकडून तालुकास्तरावर पंचायत समितीकडे तर पंचायत समितीकडून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे आले होते़ त्यापैकी 7,883 प्रस्ताव पात्र ठरले आहेत़ उर्वरित 1,232 घरकुलांचे प्रस्ताव विविध कारणांनी अपात्र ठरले आहेत़. हक्‍काच्या घरांसाठी अजून किती प्रतीक्षा करावी लागणार, असा यक्ष प्रश्‍न सर्वसामान्यांना पडला 
आहे.