Mon, Apr 22, 2019 22:23होमपेज › Konkan › राजवाडीला महामार्गाशी जोडणारा पूल धोकादायक

राजवाडीला महामार्गाशी जोडणारा पूल धोकादायक

Published On: May 21 2018 1:18AM | Last Updated: May 21 2018 1:18AMआरवली : वार्ताहर

मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्ग व राजवाडीला जोडणारा लोखंडी साकव धोकादायक बनला आहे. धोकादायक साकवावर प्रवास करु नये, असा सूचना फलक ग्रामपंचायतीने लावूनही महामार्गाला जवळचा जोडणारा साकव असल्याने ग्रामस्थ आजही या साकवावरून ये जा करत आहेत. धोकादायक साकव दुरुस्त व्हावा, अशी मागणी होत आहे.

राजवाडी ब्राम्हणवाडी जि. प. शाळेकडे जाणारा व राजवाडीतील काही घरांना जोडण्यासाठी काही वर्षापूर्वी लोंखडी साकव उभारण्यात आला आहे. लोंखडी साकव बांधण्याच्या अगोदर छोटा साकव उभारण्यात आला होता. छोट्या ओढयावर उभारण्यात आलेला हा लोंखडी साकव राजवाडीतील ग्रामस्थांना गोळवली टप्पा येथील दुकांनावर जाण्यासाठी उपयुक्‍त आहे. तसेच गोळवली टप्पा व जवळच्या गावातील विद्यार्थ्यांना राजवाडी येथील राजवाडी ब्राम्हणवाडी जि. प. शाळेत जाण्यासाठी उपयुक्‍त आहे. 

हा साकव आता धोकादायक बनला आहे. या साकवाच्या खालील बाजूला असलेल्या पट्टया गंजल्या आहेत.तसेच पुढील बाजुला असलेल्या लोंखडी पायर्‍या सुध्दा धोकादायक आहेत.साकवाचे लोंखडी सामान गंजल्यामुळे हा पुल ये जा करण्यासाठी धोकादायक असल्याचा फलक राजवाडी ग्रामपंचायतीने लावला आहे. तरीही जवळचा मार्ग म्हणून या पुलावरुन अनेक ग्रामस्थ आजही ये जा करीत आहेत. जि.प. बांधकाम विभागाने ग्रामस्थांची होणारी गैरसोय लक्षात घेवून हा साकव दुरुस्त करणे आवश्यक होते मात्र तसे न झाल्याने आज ग्रामस्थांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे.

Tags  : rajwadi bridge, dangerous, konkan news