Thu, Jul 16, 2020 09:20



होमपेज › Konkan › विहिरीला लागले पाणी अन् डोळ्यांत तरारले आनंदाश्रू

विहिरीला लागले पाणी अन् डोळ्यांत आनंदाश्रू

Published On: Jan 16 2018 10:18PM | Last Updated: Jan 16 2018 10:18PM

बुकमार्क करा




राजापूर : प्रतिनिधी

मनोहर हरी खापणे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी एक नवा आदर्श घालून दिला आहे. विद्यार्थ्यांनी सलग तीन दिवस श्रमदान करून 16 फूट खोल विहीर खोदली. त्याला इतक्या कमी खोदाईवर पाणी लागल्याने सार्‍यांच्याच डोळ्यांत आनंदाश्रू आले. 

खापणे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी करक-आंबा येथील मांडवकरवाडी येथे सलग तीन दिवस मेहनत केली. श्रमदानाने सोळा फूट खोल विहीर खोदली. या विहिरीला मुबलक पाणी लागले. यामुळे मांडवकरवाडीला मे महिन्यात भासणारी पाणीटंचाई यावर्षी दूर होणार आहे. प्रकल्पाधिकारी विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  विद्यार्थ्यांनी ही कामगिरी केली. सामाजिक बांधिलकीतून युवकांची ऊर्जा कायमस्वरूपी विधायक कामासाठी उपयोगात आणल्याने राष्ट्रीय सेवा योजनेचे ब्रीद प्रत्यक्षात उतरले. 

पाचल येथील अर्जुना मध्यम प्रकल्पाच्या पायथ्याशी करक-आंबा गावातील मांडवकरवाडी वसली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून मे महिन्यामध्ये या वाडीला पाणीटंचाईची तीव्र झळ पोहोचते. ती आता दूर होणार आहे. 

येथील वहाळामध्ये विहीर खोदण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी सरपंच विजया कोटकर, उपसरपंच सुरेश ऐनारकर, स्थानिक ग्रामस्थांकडून सविस्तर माहिती घेण्यात आली. तीन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर विद्यार्थ्यांच्या मेहनतीला यश आले. विद्यार्थ्यांनी खोदलेल्या या विहिरीमुळे मांडवकरवाडीला मे महिन्यामध्ये भासणारी पाणीटंचाई काहीअंशी कमी होईल. विहीर बांधणे तसेच कायमस्वरूपी संरक्षण आणि बंदिस्त करण्याची जबाबदारी मांडवकरवाडी ग्रामस्थांनी उचलली आहे. या शिबिर काळात तेथील संघर्षमय आयुष्याबद्दल विद्यार्थ्यांना शिकायला, अनुभवायला मिळाले. विद्यार्थ्यांकडून सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला.

समाजविकासाला योगदान : पाटील
विद्यार्थ्यांनी जिद्दीने मेहनत घेऊन खोदकाम केले. मांडवकरवाडी ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर विहीर खोदण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याला यश आले. स्थानिक ग्रामस्थांचेही मोलाचे सहकार्य लाभले. या कामातून युवकांची ऊर्जा समाज विकासासाठी उपयोगी पडल्याचे समाधान मिळाले, अशी प्रतिक्रिया विकास पाटील यांनी दिली.