Wed, May 22, 2019 10:27होमपेज › Konkan › परीक्षेच्या टेन्शनमधील विद्यार्थिनीला शिक्षण सभापतींनी दिला आधार

परीक्षेच्या टेन्शनमधील विद्यार्थिनीला शिक्षण सभापतींनी दिला आधार

Published On: Feb 23 2018 1:18AM | Last Updated: Feb 22 2018 11:00PMराजापुर : प्रतिनिधी

टळत चाललेली वेळ व दुसरीकडे कोणत्याच प्रकारचे न आलेले वाहन यामुळे परीक्षाकेंद्रावर वेळेवर पोचता येईल का, अशा तणावाखाली असलेल्या बारावीच्या विद्यार्थिनीला रत्नागिरी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती दीपक नागले यांनी मदतीचा हात देत आपल्या गाडीतून पाचलमधील परीक्षा केंद्रावर आणून सोडल्याची घटना बुधवारी  परीक्षेच्या पहिल्याच दिवशी घडली.

गेल्या बुधवारपासून बारावीच्या परीक्षेला प्रारंभ झाला. यावर्षी बारावीच्या बोर्डाच्या वतीने नवीन नियम करण्यात आला. त्यानुसार सकाळी 11 वाजता परीक्षा सुरु झाल्यानंतर उशिराने येणार्‍या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची परवानगी नाकारण्यात आली होती. त्याचे दडपण अनेक विद्यार्थ्यांवर होते.

त्या पार्श्‍वभूमीवर अणुस्कुरा (जिल्हा कोल्हापूर) परिसरातून पाचल हायस्कूलमध्ये परीक्षेसाठी एक विद्यार्थिनी चालली होती. हे अंतर सुमारे आठ ते दहा कि.मी.पेक्षा जास्त असून खासगी वाहनांची फारशी वर्दळ सकाळच्या वेळी नसते तर कोल्हापूरकडून येणारी सांगली गाडीही थोड्या उशीराने येते. अशावेळी ती विद्यार्थिनी बससह अन्य खासगी वाहन मिळते का त्याच्या प्रतिक्षेत होती. पण, कोणतेच वाहन त्यावेळी न आल्याने तिच्यावरचा तणाव वाढत चालला होता. आपल्याला वेळेवर पोचता येईल का, याच विचाराने ती त्रस्त असताना तिच्या सुदैवाने त्याचवेळी रत्नागिरी जि. प. चे शिक्षण सभापती दीपक नागले, आ. राजन साळवी यांचे स्वीय सहाय्यक रोमेश नार्वेकर व तालुका युवा सेनेचे अध्यक्ष प्रफुल्ल लांजेकर हे आपला कोल्हापूर दौरा आटोपून परतत असताना त्यांना तणावाखालील ती विद्यार्थिनी आढळली. ती शालेय गणवेशातच असल्याने बारावीच्या परीक्षेला चालली असावी, या अंदाजाने सभापतींनी आपली गाडी थांबवून  माहिती घेत तिला परीक्षा केंद्र असलेल्या पाचल येथे सोडले देखील.
शिक्षण सभापतींच्या चाणाक्ष नजरेमुळे एक बारावीची विद्यार्थिनीचे शैक्षणिक नुकसान टळले होते. शिवाय ती वेळेवर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहू शकली.