Fri, Aug 23, 2019 14:24होमपेज › Konkan › स्थानिकांचा नाणारला वाढता विरोध

स्थानिकांचा नाणारला वाढता विरोध

Published On: Apr 13 2018 10:36PM | Last Updated: Apr 13 2018 10:13PMराजापूर : प्रतिनिधी 

राजापूर तालुक्यातील नाणार येथील नियोजित रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स कंपनीच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पाला स्थानिक जनतेचा विरोध वाढत आहे. आतापर्यंत या प्रकल्पाला विरोध करणार्‍या स्थानिकांना शिवसेना, मनसे, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष, काँग्रेस यांचा पाठिंबा होता. त्यात आता राष्ट्रवादीचीही भर पडली असून, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार 10 मे रोजी प्रकल्प परिसराचा दौरा करणार आहेत. 

दरम्यान, नाणार प्रकल्प हा केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. तो प्रकल्प राज्यातून जावा, असे वाटत नाही. मात्र, स्थानिकांचा विरोध पाहता प्रकल्पाची जागा बदलण्याबाबत विचार होऊ शकतो, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त करीत नाणार प्रकल्पाच्या वादात शुक्रवारी उडी घेतली आहे.

इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियम या तीन भारतीय तेल कंपन्यांच्या सहकार्याने राजापूर तालुक्यातील नाणार येथे संयुक्त तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या भागीदार असलेल्या सौदी अरेबियातील ‘अरामको’ कंपनीशी बुधवारी नवी दिल्लीत सामंजस्य करारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत स्वाक्षर्‍या झाल्या. ‘अरामको’ ही जगातील सर्वाधिक तेल उत्पादन करणारी कंपनी महाराष्ट्रातील 44 अब्ज डॉलर्सच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पातील 50 टक्के हिस्सा खरेदी करणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प मार्गी 
लागण्यासाठी केंद्र शासनाने कंबर कसली आहे.

या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष अजित यशवंतराव यांनी कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम, रामचंद्र भडेकर, नितीन जड्यार, नाणारचे सरपंच ओंकार प्रभुदेसाई, गिरीष मोंडे, कमलाकर कदम, भाई सामंत यांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी पवार यांनी नाणार प्रकल्पाला वाढता विरोध लक्षात घेऊन स्थानिकांची भेट घेणार असल्याचे सांगितले. 

भारताच्या पश्‍चिम किनार्‍यावर वसलेल्या राजापूर तालुक्यातील नाणार येथील प्रकल्पामुळे सौदी अरेबियातून कमी खर्चात भारताला इंधन उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाला सौदी अरेबिया 60 दशलक्ष टन क्षमतेपैकी अर्धा पुरवठा करणार आहे. उर्वरित भाग भांडवल इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियम या तीन सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांचे असणार आहे. या प्रकल्पाची क्षमता प्रतिदिन 12 लाख बॅरल इतकी राहणार आहे.

नाणार परिसरातील 14 गावांमधील सुमारे 15 हजार एकर जमिनीवर हा नियोजित प्रकल्प होणार आहे. या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. स्थानिकांच्या वाढत्या विरोधानंतर राजकीय पक्षही यात उतरले. याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावेळी स्थानिकांचा विरोध असेल तर प्रकल्प लादणार नाही, असे आश्‍वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र तरीही हा प्रकल्प करण्याची तयारी केंद्राने केली आहे. बुधवारी सामंजस्य करार झाल्यानंतर या विरोधाने अधिक बळ घेण्यास सुरूवात केली आहे. काही महिन्यांपूर्वी ‘मनसे’ नेते  राज ठाकरे यांनी नाणार परिसराचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या पाठिशी असल्याचे सांगितले होते.