Thu, Jul 18, 2019 14:24होमपेज › Konkan › ‘रिफायनरी’चा मुद्दा शिवसेनेला भोवला

‘रिफायनरी’चा मुद्दा शिवसेनेला भोवला

Published On: Mar 01 2018 1:36AM | Last Updated: Feb 28 2018 11:06PMराजापूर : प्रतिनिधी

रिफायनरी प्रकल्पाच्या प्रश्‍नावरुन लढविण्यात आलेल्या सागवे ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेला अपक्ष उमेदवाराकडून पराभव स्वीकारावा लागला आहे.  या निवडणुकीत श्रीमती नेहा नंदकिशोर दुसणकर या 117 मतांनी विजयी झाल्या आहेत. अन्य चार ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.

गेले काही महिने सागवे - नाणार परिसरात रिफायनरी प्रकल्पावरुन जोरात विरोधाचे वातावरण असून स्थानिक जनता या प्रकल्पाविरुद्ध दंड थोपटून उभी ठाकली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर तालुक्यातील सर्वात मोठ्या अशा सागवे ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक पार पडली. यापूर्वी येथील प्रभाग क्रमांक 4 मधून विजयी झालेल्या व नंतर सागवे गावच्या सरपंच बनलेल्या सौ. लक्ष्मी शिवलकर या गतवर्षी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत सागवे गटातून शिवसेनेकडून विजयी झाल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी गेल्या मंगळवारी मतदान पार पडले होते. त्याचा निकाल बुधवार दि. 28 फेब्रुवारीला लागला. या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचेच लक्ष लागून राहिले होते. कारण केंद्र व राज्यातील सत्ताधारी शिवसेनेच्या भूमिकेवरुन निर्माण झालेले वातावरण व रिफायनरी प्रकल्पाविरुद्ध वाढते विरोधातील वातावरण यामुळे ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली होती. दोन्ही बाजूंनी जोरदार प्रचार करण्यात आला होता . प्रकल्पाविरोधी वातावरण असल्याने गावातील जनता प्रकल्पाविरोधात एकवटली होती व त्यांनी रिंगणात उतरवलेल्या अपक्ष उमेदवार नेहा नंदकिशोर दुसणकर यांनी विजय मिळवला. त्यांना चारशे नऊ तर त्यांच्या विरोधात लढलेल्या सेनेच्या उमेदवार प्रणिता प्रवीण पेडणेकर यांना 292 मते मिळाली. या विजयाने रिफायनरी विरोधकांनी जल्लोष केला तर सेनेला त्यांच्या बालेकिल्ल्यात मिळालेला दणका असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत .

या व्यतिरिक्त तालुक्यातील 4 ठिकाणी बिनविरोध निवडणुका झाल्या. त्यात प्रिंदावण प्रभाग क्रमांक 3 मधून विनायक यशवंत धुरी, अणसुरे प्रभाग क्रमांक 3 मधून विनोद अशोक गावकर, देवाचे गोठणे प्रभाग 2 मधून रमाकांत वासुदेव मुळम, ओझर प्रभाग क्रमांक 1 मधून वर्षा वसंत कोकरे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. तहसीलदार प्रतिभा वराळे यांच्या उपस्थितीत  मतमोजणी  पार पडली.