Sun, Mar 24, 2019 22:56
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › नाणार प्रकल्प जाणार की राहणार

नाणार प्रकल्प जाणार की राहणार

Published On: Feb 21 2018 1:20AM | Last Updated: Feb 21 2018 1:20AMराजापूर : प्रतिनिधी

स्थानिक जनतेचा विरोध असेल तर प्रकल्प होणार नाही, असे वचन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांसमोर दिली असतानाच आता दुसरीकडे मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेत नाणार रिफायनरी प्रकल्पाची माहिती देणारा स्टॉल लागल्याने या प्रकल्पाबाबत उलट-सुलट चर्चेला उधाण आले असून नाणार आता जाणार का राहणार, अशी विचारणा होऊ लागली आहे.

जगातील सर्वात मोठ्या अशा नाणार प्रकल्पावरुन रणकंदन सुरु आहे. सत्ताधारी भाजप वगळता उर्वरित सर्व पक्षांनी या प्रकल्पाविरुद्ध रान उठवले आहे. मात्र, अंतर्गत राजकारणाच्या माध्यमातून राजकीय शिमगा सुरु असल्याने प्रखर विरोध असूनही रिफायनरीला विरोध करणारे पक्ष एकत्र येऊन विरोध करीत नसल्याचे चित्र लपून राहिलेले नाही. गेल्या आठवड्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यान्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.त्या भेटीतील झालेल्या चर्चेचा  सर्वच तपशील पुढे आला नसला तरी पर्यावरणाला असलेला धोका म्हणूनच स्थानिकांचा  रिफायनरी प्रकल्पाला विरोध असल्याचे सांगत शिवसेना स्थानिक जनतेसमवेत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले होते. त्यावेळी जर स्थानिक जनतेचा विरोध असेल तर प्रकल्प होणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती स्वत: उद्धव ठाकरे यांनी दिली होती. तर मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेत रिफायनरी प्रकल्पावर सामंजस्य करार होणार नसल्याची माहिती स्वत: उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी  दिली होती. त्यामुळे रिफायनरी प्रकल्प आता कोकणातून हद्दपार होणार, असेच वाटत असताना मुंबईत सुरु झालेल्या मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेत रिफायनरी प्रकल्पाबाबतची माहिती देणारा स्टॉल लावण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकीकडे स्थानिकांचा विरोध असेल तर प्रकल्प होणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले असतानाच दुसरीकडे मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेत रिफायनरीची माहिती देणारा स्टॉल लावण्यात आल्याने शासन हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी जोरदार तयारीत असल्याच्या शंका व्यक्त केल्या जात आहेत. त्यामुळे निर्माण झालेली अस्थिरता आणखीनच वाढणार असल्याचे दिसू लागले आहे.

दरम्यान, शासनाने हा प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केला तर तो हाणून पाडला जाईल, या तयारीत स्थानिक जनता असून रिफायनरीवरचा संघर्ष आणखी उग्र बनण्याच्या तयारीत असून या पार्श्‍वभूमीवर हा जाणार की राहणार, याबाबत चर्चा सुरु झाली आहे.