Mon, Mar 25, 2019 05:06
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › नाणार कराराला जनता भीक घालणार नाही

नाणार कराराला जनता भीक घालणार नाही

Published On: Jun 30 2018 10:54PM | Last Updated: Jun 30 2018 10:22PMराजापूर : प्रतिनिधी

दिल्लीत कितीही करार झाले तरी नाणारची जनता आपल्या मतावर ठाम आहे. आजपर्यंत इतका मोठा विरोध होऊनही शासनाला दिसत नसेल तर त्यांनी कोकणात येऊन येथील जनतेचा विरोध पहावा. आजवर रिफायनरी संदर्भात शासनाच्या प्रत्येक भूमिकेला येथील जनतेने विरोध केला आहे. त्यामुळे ‘नाणार’बाबत शासनाने केलेल्या सामंजस्य कराराला कोकणी जनता भीक घालणार नाही, असा टोला शेतकरी मच्छीमार संघटनेचे उपाध्यक्ष संजय राणे यांनी लगावला आहे.

केंद्रशासन जर कोकणी जनतेला डावलून हा प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न करीत असेल तर येथील जनता गप्प बसणार नाही. प्राण गेला तरी चालेल परंतु, आम्ही आमची जमीन शासनाला देणार नाही, अशी येथील प्रकल्पग्रस्तांची भूमिका आहे. त्यामुळे शासनाला प्रकल्प रद्द करावाच लागेल. शिवसेनेला डावलून जर भाजप सरकार करार करीत असेल तर शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावे व उद्योग मंत्र्यांनीही आपल्या राजीनामा द्यावा, आणि शिवसेनेने येथील जनतेसोबत रस्त्यावर उतरावे. शिवसेनेने नुसत्या फुशारक्या मारून कोकणी जनतेला वार्‍यावर सोडू नये. अन्यथा 2019 च्या निवडणुकीत येथील जनता शिवसेनेला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा टोलाही राणे यांनी लगावला आहे.

कागदावर नुसते करार केले म्हणजे प्रकल्प झाला, असे जर भाजप सरकारला वाटत असेल तर त्यांचे हे करार कागदावरच राहणार आहेत. येथील जनेतेने 32/2 च्या नोटिसांना विरोधात्मक उत्तरे दिली आहेत, तसेच भूसंपादनाला विरोध केला आहे. 95 टक्के लोकांनी असहमती पत्रे दिली आहेत. एवढा विरोध असतानाही जर मुख्यमंत्र्यांना नाणारचा विरोध दिसत नसेल तर त्यांनी स्वतः नाणारमध्ये यावे, असे आव्हानही राणे यांनी केले. तसेच पावसाळी अधिवेशनादरम्यान कोकणातून हजारो लोक विधिमंडळापुढे धरणे आंदोलनासाठी जाणार असून तेथे विरोध दर्शविणार आहेत. जनतेने सरकारच्या या करारांवर विश्‍वास ठेवू नये. दरम्यान, असल्या कागदावरच्या करारांना जनतेनेही भीक घालू नये, असे आवाहनही संघटनेकडून करण्यात आले आहे.