Thu, Jul 18, 2019 08:05होमपेज › Konkan › नाणारमध्ये जमिनी खरेदी केलेल्या परराज्यवासीयांचे धाबे दणणार

नाणारमध्ये जमिनी खरेदी केलेल्या परराज्यवासीयांचे धाबे दणणार

Published On: Jul 20 2018 11:24PM | Last Updated: Jul 20 2018 11:07PMराजापूर : प्रतिनिधी

नागपूर येथील सुरु असलेल्या अधिवेशनामध्ये नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी पेट्रोकेमिकल प्रकल्पाबाबत शुक्रवारी पुन्हा एकदा औचित्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. रिफायनरी प्रकल्पाच्या नियोजित जागेच्या ठिकाणी परराज्यातील व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात खरेदी केलेल्या जमीन व्यवहारांची सरकारकडून चौकशी करण्याबाबत व खरेदीखत रद्द करण्याबाबत आ. राजन साळवी यांनी आपली भूमिका औचित्याचा मुद्दा या आयुधाद्वारे सभागृहामध्ये मांडून शासनाचे लक्ष वेधून घेतले.

नागपूर येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दिवशी आ. साळवी यांनी या विषयावर औचित्याचा मुद्दावर बोलताना स्पष्ट केले की, कोकणातील राजापूर तालुक्यामध्ये होऊ घातलेल्या केंद्र सरकारच्या रिफायनरी प्रकल्पासाठी जवळजवळ 2200 एकर जमीन खरेदी केलेली असून त्यामध्ये परराज्यातील व्यक्तींनी या जागा खरेदी केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने गुजरात राज्यातील गौरव जैन, दीपेन मोदी, पुनित वाधवा, प्राची त्रिपाठी, सतीश केडिया, हिमंशू निलावार, दिनेश शहा संतोष कटारिया, नंदकुमार चांडक, अमित ठावरी, रमाकांत राठी, मनीष झुनझुनवाला, संजय दुधावत, 

अस्मिता मांगुकिया अशा एकशे दहा व्यक्ती असल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्वांनी शेतकरी असल्याचा दाखला न घेताच खरेदीखत केल्याचे समजते.  त्यामुळे खरेदी केलेल्या जमीन व्यवहारांची चौकशी करण्यात येऊन गैरव्यवहारामधील दोषींना शिक्षा करण्यात यावी व खरेदीखते रद्द करण्यात यावी, अशी मागणी  आ. साळवी यांनी सभागृहात केली.

आ. राजन साळवी यांनी रिफायनरी प्रकल्पाच्या जागेच्या ठिकाणी खरेदी केलेल्या जमीन व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी विधिमंडळात केल्यामुळे परराज्यातील व्यक्तींचे धाबे दणाणणार असल्याचे दिसत 
आहे.