Mon, May 27, 2019 00:38होमपेज › Konkan › ‘नाणार’विरोधात निदर्शने

‘नाणार’विरोधात निदर्शने

Published On: Jul 18 2018 10:41PM | Last Updated: Jul 18 2018 9:58PMराजापूर : प्रतिनिधी

तालुक्यातील नाणार रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक जनतेतून विरोध केला जात असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मात्र हा विरोध दिसत नसल्यामुळे प्रकल्प विरोधकांनी प्रकल्पाच्या विरोधात एकापाठोपाठ असे आंदोलन सत्र सुरू ठेवले आहे. नागपूर अधिवेशनात धरणे आंदोलन, मुंबईत दादर येथे निदर्शने झाल्यानंतर बुधवारी तालुक्यातील डोंगर तिठा निदर्शने करण्यात आली.
नाणार प्रकल्पाला विरोध होत असताना शासन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाणारबाबत पर्यावरणीय बाबींचा अभ्यास करून ‘समृद्धी’प्रमाणे चर्चा करण्याची भाषा करत आहेत. प्रकल्प विरोधकांनी विविध आंदोलन, मोर्चे, निवेदने यांच्या माध्यमातून विरोध शासनापर्यंत  पोचविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, त्यांना प्रकल्पग्रस्त जनतेचा विरोध दिसत नाही. त्यामुळे या प्रकल्पाविरोधात आंदोलनाचे सत्र सुरू करण्यात आले आहे. प्रथम नागपूर अधिवेशनात धरणे आंदोलन, त्यानंतर मुंबई-दादर येथे निदर्शने झाल्यानंतर बुधवारी राजापूर तालुक्यातील डोंगर येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. 

बुधवारी सकाळी 10 वाजल्यापासूनच डोंगरतिठा याठिकाणी निदर्शने करण्यासाठी प्रकल्पग्रस्त, शेतकरी व मच्छीमार मोठ्या प्रमाणात जमा होऊ लागले. त्यानंतर 11 वाजल्यापासून निदर्शने करण्यास सुरूवात झाली. सत्ताधार्‍यांविरोधात सुमारे दीड तास घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी प्रकल्पाला विरोध माहिती असूनही येथील जनतेसोबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री येणार असे सांगत आहेत. मात्र, आता येथील ग्रामस्थांना या प्रकल्पाबाबत चर्चा करण्याची इच्छाच नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. या प्रकल्पाला येथील जनतेचा सुरूवातीपासूनच विरोध आहे व आजही तो कायम आहे. हा प्रकल्प येथून रद्द करण्यात यावा, या एकमेव मागणी शिवाय अन्य कोणतीही मागणी येथील जनतेची नाही. शासनाला हा विरोध कळत नसेल तर भविष्यात प्रकल्पाविरोधात उग्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात यावेळी उपस्थितांना दिला. 

यावेळी रिफायनरीविरोधी शेतकरी- मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष कमलाकर कदम, ओंकार प्रभुदेसाई, सचिव भाई सामंत यांच्यासह अन्य पदाधिकारी, सेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शिवसैनिक उपस्थित होते.