Fri, Jul 19, 2019 05:11होमपेज › Konkan › अडीच कोटींचे शिलकी अंदाजपत्रक मंजूर

अडीच कोटींचे शिलकी अंदाजपत्रक मंजूर

Published On: Feb 28 2018 1:15AM | Last Updated: Feb 27 2018 10:22PMराजापूर  : प्रतिनिधी

उपनगराध्यक्ष जमीर खलिफे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या न. प.च्या सभेत शहरासाठी 2 कोटी 55 लाखांचा शिलकीचा अर्थसंकल्प बहुमताने मंजूर करण्यात आला. या अर्थसंकल्पात नागरिकांवर कोणत्याही प्रकारच्या करवाढीचा बोजा टाकलेला नाही. या अंदाजपत्रकात सायबाचे धरण, शहरातील रस्ते, गटारे, सांडपाणी व्यवस्था आदी विविध कामांसाठी तरतूद करण्यात आली आहे. 

राजापूर नगरपरिषदेच्या नाथ पै सभागृहामध्ये उपनगराध्यक्ष खलिफे यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. या सभेला विरोधी गटनेते विनय गुरव, मुख्याधिकारी नयना ससाणे, मुख्य लिपिक किशोर जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 

स्थायी समितीने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये किरकोळ बदल करून सन 2018-19 चा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. रस्ता अनुदानाचा निधी फक्‍त कोंढेतड पुलाच्या कामासाठी खर्च न करता शहरातील अन्य भागातील रस्त्यांच्या कामासाठी खर्च करण्याची तरतूद ठेवण्याची सूचना विनय गुरव यांनी मांडली तर शहरातील गुजराळी येथील श्री लक्ष्मी-नारायण मंदिराच्या येथील बांधकामासाठी भरीव तरतूद करण्याची मागणी शिवसेनेच्या प्रतीक्षा खडपे आणि राष्ट्रवादीचे संजय ओगले यांनी केली. त्याप्रमाणे या कामासाठी 25 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली.

यावेळी झालेल्या चर्चेमध्ये उपनगराध्यक्ष खलिफे यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक हनिफ युसूफ काझी, स्नेहा कुवेस्कर, शिवसेनेच्या शुभांगी सोलगावकर, पूजा मयेकर यांच्यासह बांधकाम सभापती बाकाळकर, पाणीपुरवठा सभापती चव्हाण, क्रीडा समिती सभापती खडपे आदींनी चर्चेत भाग घेतला.