Sat, Aug 24, 2019 23:53होमपेज › Konkan › ‘नाणार’बाबत झटपट निर्णय घ्या

‘नाणार’बाबत झटपट निर्णय घ्या

Published On: Apr 09 2018 10:44PM | Last Updated: Apr 09 2018 10:19PMराजापूर : प्रतिनिधी

नाणारमधील प्रकल्पग्रस्तांशी चर्चा करून रिफायनरीबाबतचा निर्णय घेऊ, असे आश्‍वासन देणार्‍या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्प परिसरातील जनतेची भेट घ्यावी आणि झटपट निर्णय घ्यावा, अशी मागणी  शिवसेनेचे सचिव खा. विनायक राऊत यांनी केली. त्यांनी सोमवारी राजापूर येथे पत्रकार परिषदेत माहिती दिली. रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स कंपनीचे अधिकारी नाणार परिसरात जनतेला भेटण्यासाठी आले तर त्यांना पळवून लावू, असा इशाराही त्यांनी दिला.

रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेचा सुरुवातीपासून विरोध आहे. या प्रकल्पाविरोधात संघर्ष करणारे भाई सामंत  आणि जनतेसमवेत शिवसेना असल्याचे खा. राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले. नाणार परिसरातील 14 गावांचा या प्रकल्पाला  विरोध असताना कंपनीच्या अधिकार्‍यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषद घेऊन  रिफायनरीला फक्त 14 टक्के जनतेचा विरोध असल्याचे विधान केले होते. त्याचा खासदार राऊत यांनी  समाचार घेतला. रिफायनरीला विरोध नसल्याचे विधान प्रकल्प परिसरात येऊन करून दाखवा आणि काय होते ते पाहा, असे आव्हान त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले. यापुढे नाणार परिसरात कंपनीचे कुणी अधिकारी आढळून आले, तर त्यांना  पळवून लावल्याशिवाय राहणार नाही. शिवाय, त्यांच्या रत्नागिरीमधील कार्यालयावर शिवसेनेचा मोर्चाही काढू, असा इशारा खा. राऊत यांनी दिला.

कोकण रेल्वेबाबत प्रकल्पग्रस्तांच्या अनेक समस्या आहेत. त्यासाठी दि. 19 एप्रिलला रत्नागिरीत कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांच्याशी बैठक आयोजित केली असल्याची माहिती खासदारांनी दिली. या पत्रकार परिषदेला आ. राजन साळवी, तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर यांच्यासह अन्य सेना पदाधिकारी उपस्थित होते.