Mon, Jun 17, 2019 18:15होमपेज › Konkan › रिफायनरी विरोधात राजापुरात कडकडीत बंद

रिफायनरी विरोधात राजापुरात कडकडीत बंद

Published On: Dec 29 2017 1:34AM | Last Updated: Dec 28 2017 9:46PM

बुकमार्क करा
राजापूर/जैतापूर : प्रतिनिधी

रिफायनरी विरोधात पुकारण्यात आलेल्या राजापूर तालुका बंदला 100 टक्के प्रतिसाद लाभला. राजापूर शहरासह तालुक्यातील विविध ठिकाणच्या बाजारपेठाही गुरुवारी बंद होत्या. प्रकल्प विरोधी शेतकरी व मच्छीमार संघटनेसह अनेक पक्षांनी बंद यशस्वी करण्यासाठी मोठी भूमिका बजावली.  बंददरम्यान आ. राजन साळवी आपल्या सहकार्‍यांसह तालुक्यात फिरून लोकांना आवाहन करताना दिसत होते.

शासनाने रिफायनरी प्रकल्प कोकणवासीयांच्या माथी मारल्याचा आक्षेप घेत संतापलेल्या प्रकल्पविरोधी शेतकरी व मच्छीमार संघटनेने शासनाचा जोरदार निषेध करीत प्रकल्प रद्द करण्यासाठी राजापूर ‘तालुका बंद’ची हाक दिली होती. त्यानुसार गुरुवारी कडकडीत बंद पाळण्यात आला.पबाजारपेठांत शुकशुकाट.

राजापूर/जैतापूर : प्रतिनिधी बंदच्या हाकेमुळे गुरुवारी सकाळपासून कोणतीच दुकाने उघडली नव्हती. राजापूर शहरासह  ओणी, सौंदळ, वाटूळ, पाचल, नाटे, साखरीनाटे, नाणार, कुंभवडे, सागवे, केळवली, जैतापूर, हातिवले, कोंड्ये, कशेळी बाजारपेठेसह  तालुक्यात शंभर टक्के बंद पाळण्यात आला. तालुक्यातील सर्वच ठिकाणच्या बाजारपेठा बंद राहिल्याने शुकशुकाट पसरला होता. यामुळे राजापूर शहरात भरणारा आठवडा बाजारही बंद असल्याने तो भाग सुनासुना वाटत होता. नेहमी गजबजलेल्या जवाहर चौकात तुरळक गर्दी पहायला मिळाली. रिफायनरी प्रकल्प होत असलेल्या नाणार -सागवे परिसरातील चौदा गावांसह जैतापूर नाटे भागातही कडकडीत बंद पहावयास मिळाला.  बंदला समर्थन देताना साखरी नाटेतील अनेक मच्छीमारांनी आपापल्या  मासेमारी नौका किनार्‍यावर लावून बंदमध्ये सहभाग घेतला.

या बंदमध्ये तालुक्यातील विविध ठिकाणच्या रिक्षा संघटनाही सहभागी झाल्या. मात्र, एस. टी.ची सेवा सुरळीत सुरु होती. या व्यतिरिक्त तालुक्यातील सर्व शासकीय  व  निमशासकीय  कार्यालये मात्र उघडी होती. मात्र, बंदचा परिणाम या कार्यालयांतही दिसून आला. त्याही ठिकाणीही गुरुवारी गर्दी तुरळक होती.

बंद दरम्यान तालुक्यातील शाळा, विद्यालये, महाविद्यालये सुरुच होती.  बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरातील जवाहर चौक परिसरासह शहरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उपविभागीय पोलिस अधिकारी मारुती जगताप, राजापूरचे सहायक पोलिस निरीक्षक रायसिंग पाटील व त्यांचे सहकारी गस्तीसाठी फिरताना दिसत होते.

हा बंद रिफायनरी प्रकल्प विरोधी शेतकरी व मच्छीमार संघटनेने पुकारला होता. त्याला अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला. त्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, ‘मनसे’चाही सामावेश होता. राजापूरचे आ. राजन साळवी, उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, शहरप्रमुख संजय पवार,  पं. स. सभापती सुभाष गुरव यांच्यासह सेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते या बंद दरम्यान सर्वत्र फिरत होते. तालुक्यात शांततापूर्ण मार्गाने हा बंद यशस्वी झाला. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.