Wed, Jun 26, 2019 23:30होमपेज › Konkan › ‘तिच्या’ नियमित  कालखंडाला छेद

‘तिच्या’ नियमित  कालखंडाला छेद

Published On: Dec 07 2017 1:32AM | Last Updated: Dec 06 2017 11:00PM

बुकमार्क करा

राजापूर : प्रतिनिधी

गंगेच्या अलीकडच्या आगमन व गमन या नियमित कालखंडाला छेद गेला असून मधली काही वर्षे तर तिचे सलग आगमन झाले  होते. तिचा वास्तव्य कालावधीही खूपच लांबला होता. दि. 31 ऑगस्ट 2016 रोजी गंगा अवतीर्ण झाल्यानंतर  ती दि. 17 नोव्हेबरला 2016 रोजी ती अंतर्धान पावली होती. त्यानंतर या वर्षी दि. 7  मे 2017 ला ती पुन्हा अवतीर्ण झाली आणि 19 जून 2017 ला अंतर्धान पावली होती.  या घटनेला सहा महिने उलटत असतानाच  बुधवारी  पुन्हा गंगेचे आगमन झाले आहे.

गंगाक्षेत्रावरील पुजारी (गंगापुत्र)पुजेसाठी गेले असता गंगा आगमन झाल्याचे त्यांनी पाहिले. गंगा आगमनानंतर गंगा तीर्थक्षेत्री सर्वात मोठे असणारे काशीकुंड तुडुंब भरुन गोमुखातून हळुहळू पाणी वाहत होते.  आगमनानंतर काही वेळाने गंगेचा प्रवाहही वाढला होता. मूळ गंगेचा प्रवाह मोठ्या स्वरुपात वाहत होता. उर्वरित सर्व कुंडांमध्येही चांगल्या प्रकारे पाणी होते. त्यानंतर पुजार्‍यांकरवी गंगा आगमनाचे वृत्त सर्वत्र पसरल्यावर तत्काळ सोशल मीडियावरुन गंगा आगमनाचे संदेश फिरु लागले. दरम्यान, गंगेच्या आगमनाची  माहिती मिळाल्यानंतर असंख्य भाविकांनी गंगा क्षेत्रावर धाव घेतली. काहींनी तर पवित्र स्नानाची पर्वणी साधली. आगमनाच्या पहिल्याच दिवशी दिवसभर भाविकांची   गंगास्थानाकडे रिघ सुरु होती. केवळ सहा महिन्यांनंतर गंगेचे आगमन झाल्याने भाविकांतून आनंद व्यक्‍त होत आहे.