होमपेज › Konkan › राजापूरच्या गंगामाईचे विज्ञानालाच आव्हान

राजापूरच्या गंगामाईचे विज्ञानालाच आव्हान

Published On: Jan 01 2018 1:59AM | Last Updated: Dec 31 2017 9:35PM

बुकमार्क करा
राजापूर : शरद पळसुलेदेसाई

समस्त भाविकांच्या भक्तीमार्गाचा मानबिंदू तर साक्षात विज्ञानालाच थेट आव्हान देणार्‍या राजापूरच्या गंगामाईचे काही दिवसांपूर्वी अनपेक्षित आगमन झाले.  दर तीन वर्षांनी आगमन व गमन असा कालखंड  ठरलेल्या गंगेची ती  प्रथा मागील काही  वर्षांत काहीशी विस्कळीत झाल्याने तिच्या आगमनाबाबत पूर्वीएवढा असणारा उत्साह  आता तसा जाणवत नाही. अशा या  स्थानाचे पावित्र्य अबाधित राखणे ही मोठी जबाबदारी आहे.

राजापूरच्या नावलौकीकाचा बोलबाला करणार्‍या ठळक वैशिष्ट्यांपैकी एक असलेली राजापूरची गंगा म्हणजे एक चमत्कार मानावा लागेल. कारण मूळगंगेसह  तब्बल चौदा कुंडात अचानक गंगेचे आगमन होणे व त्यानंतर तिचे  काही काळ वास्तव राहणे, हा खरोखरच चमत्कार मानावा लागेल. या चौदा कुंडातील पाण्यांतील तापमानातील  जाणवणारा फरक हे विज्ञानाला पडलेले एक कोडे आहेच शिवाय आव्हानही आहे.

 या गंगेबद्दल बरीच माहिती आजवर  प्रसिद्ध आहे. तिचा इतिहास सवार्ंना ठाऊक झाला आहे .एकूणच या क्षेत्राबद्दलची माहिती व महती दुरवर पोहचली आहे. या क्षेत्रावरील असलेली कुंडे, त्यांची नावे, दर तीन वर्षांनी  होणारे गंगेचे आगमन व गमन असा तिचा एक अपवाद वगळता  नियमित राहिलेला कालखंड, छत्रपती शिवाजी महाराज, कवी मोरोपंत  या व अशा थोर व आदर्श युगपुरुष मंडळींनी गंगास्थानाला दिलेल्या भेटी, येथील विधीवत होत असलेल्या पुजाअर्चा, गंगापुत्रांची घराणी या सर्वांची  साक्षीदार असलेली गंगा पवित्र मानली गेली आहे.

राजापूरची गंगा अनेक वर्षे  दर तीन वर्षांनी प्रकट होत होती. साधारणतः तिसर्‍या वर्षी ती अवतीर्ण व्हायची. तिचा वास्तव्याचा कालावधी हा शंभर दिवस व त्याच्या आसपास तर कमीतकमी कालावधी हा एक आठवडा किंवा त्यापेक्षाही कमी राहिला आहे. मात्र मागील काही वर्षांत तिचे आगमन व गमन या प्रक्रीयेत विस्कळीतपणा आला आहे. मागील काही  वर्षांत या गंगेचे आगमन झाल्यानंतर काही अपवाद वगळता तिचा प्रवाह हा वाहता राहिला आहे. फार पूर्वी तब्बल अठरा वर्षे गंगा प्रकट झाली नव्हती, असेही सांगितले जाते. यापूर्वी10 फेब्रुवारी 2011 ला ती तिच्या नियमानुसार तिसर्‍या वर्षी प्रकट झाली होती व 5 जून 2011 ला अंतर्धान पावली होती. त्यानंतर सन 2012 ला सलग दुसर्‍या वर्षी गंगा प्रकट झाली व सर्वांना आश्‍चर्याचा धक्का बसला होता. कारण गंगा अशी सलग दुसर्‍या वर्षी प्रकटल्याची घटना तिच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली होती . त्यावेळी 11 एप्रिल 2012 आलेली गंगा  23 जून 2013 ला अंतर्धान पावली होती. हा तिचा कालावधी खूपच प्रदीर्घ राहिला होता. आजवर ती एवढा कालावधी कधीच वास्तव्यास राहिली नव्हती. हा सुध्दा गंगेचा एक अनोखा विक्रम झाला होता.

पुढे दिनांक23 जून 2013 ते 31 जानेवारी 14, दिनांक 23 जुलै 14 ते 30 ऑक्टोबर 14, दिनांक 27 जुलै 15 ते  5 नोव्हेंबर 15, दिनांक 31 ऑगस्ट 16 ते 17 नोव्हेंबर 16 असा आगमन व गमनाचा तिचा कालावधी राहिला होता व त्यानंतर ती 7 मे 2017 ला अवतीर्ण झाली होती. तो कालावधी कमी राहिला होता. दिनांक 19 जून 2017 ला ती अंतर्धान पावली होती. दर तीन वर्षांच्या आगमन व गमन अशा तिच्या नियमिततेचे गणित बिघडले होते. यानंतरच्या कालावधीत ती आपला नेम कायम ठेवील, असे वाटत असताना सहा महिन्यांचा कालावधी लोटतो न लोटतो तोच 6 डिसेंबर 2017 ला सकाळी गंगेचे आगमन झाले.

यापूर्वी दर तिसर्‍या वर्षी गंगेच्या आगमनाचे वेध लागायचे. पावसाळा समाप्त होताच सोसाट्याचा वारा सुटायचा व यथावकाश गंगा अवतिर्ण व्हायची. गंगेचे आगमन झाल्याची खबर हा - हा म्हणता शहरासह संपूर्ण तालुक्यात व त्याच्याबाहेर पसरायची व सर्व भाविक गंगास्नानासाठी त्या क्षेत्रावर धावून जायचे, मात्र अलिकडच्या काही वर्षांत  दर तीन वर्षांच्या तिच्या आगमन व गमन या प्रक्रीयेत मोठा फरक पडला. त्यामुळे तिच्या आगमनाबाबत पूर्वी जी उत्सुकता असायची ती कमी झाली आहे. तरीदेखील भाविक गंगा आली हे पाहून दररोज स्नानासाठी जात असतात. भाविकांनी गंगेचे पावित्र्य राखून स्नान उरकणे आवश्यक आहे मात्र तसे चित्र दिसत नाही.