Thu, Mar 21, 2019 11:06होमपेज › Konkan › राजापूरचा लोकनियुक्त नगराध्यक्ष आज ठरणार

राजापूरचा लोकनियुक्त नगराध्यक्ष आज ठरणार

Published On: Jul 15 2018 10:55PM | Last Updated: Jul 15 2018 10:32PMराजापूर  : प्रतिनिधी

राजापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत सरासरी 68 टक्के मतदान झाले असून, विजयाचे दावे-प्रतीदावे सुरू झाले आहेत. सोमवार, 16 जुलैला मतमोजणी होणार असून, तिरंगी लढतीत राजापूरचा लोकनियुक्त नगराध्यक्ष कोण होणार, याचीच उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.

राजापूर नगराध्यक्षपदासाठी रविवारी सकाळी मतदानाला प्रारंभ झाला. एकूण 8 मतदान केंद्रांवर मतदान सुरू होते. सुरुवातीला मतदानाची प्रक्रिया संथगतीने सुरू होती. दुपारनंतर मतदानाला वेग आला. राजापूर नगराध्यक्षपदासाठी काँग्रेस आघाडी विरुद्ध स्वतंत्रपणे लढणारी शिवसेना - भाजप असा तिरंगी सामना असून त्यामध्ये आघाडीचे अ‍ॅड. जमीर खलिफे, शिवसेनेचे अभय मेळेकर व भाजपचे गोविंद चव्हाण हे उमेदवार रिंगणात आपले नशीब आजमावत असून त्यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. 

या निवडणुकीतील आठही केंद्रात सर्वत्र मतदान प्रक्रीया सुरळीत पार पडली.  दिवसभर प्रत्येक उमेदवार, त्यांचे पदाधिकारी व  कार्यकर्ते यांची धावपळ दिसून आली. दुपारनंतर मतदानाला गती आली. रविवार असल्याने अनेकांनी आपापली कामे करुन नंतर मतदान केंद्रांवर हजेरी लावली. सायंकाळी साडेतीन वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी 55 च्या  आसपास होती.

अखेरच्या टप्प्यात मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जोरदार धावपळ सुरु होती. अखेर सायंकाळी साडेपाचला मतदानाची मुदत समाप्त झाली. एकूण 7 हजार 551 मतदार राजापूर शहरात असून त्यापैकी 5 हजार 135 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे सरासरी 68 टक्के मतदान झाले.

मतदान  प्रक्रीया समाप्त होताच विजयाचे दावे-प्रतीदावे करण्यात आले. आता सोमवारी सकाळी 10 वाजता राजापूर नगर परिषदेत मतमोजणी सुरु होणार असून त्यामध्ये बाजी मारणारा राजापूरचा नगराध्यक्ष होणार आहे. तो बहुमान कोण पटकावतो, त्याकडे राजापूरसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.