Tue, Aug 20, 2019 04:42होमपेज › Konkan › मनसे रे! राज यांनी स्‍टॉलवर घेतला वडापावचा आस्‍वाद 

मनसे रे! राज यांनी स्‍टॉलवर घेतला वडापावचा आस्‍वाद 

Published On: May 24 2018 1:05PM | Last Updated: May 24 2018 1:23PMनांदगाव : वार्ताहर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या भाषणाने गर्दी करतात हे आपल्याला माहितच आहे. पण त्यांच्या कोकण दौऱ्यात एक वेगळे चित्र पाहायला मिळाले. नेत्यांच्या दौऱ्यात अलिशान हॉटेल आणि मेजवाणीचे अनेक किस्से आपण ऐकले असतील. पण फार क्वचितच  एखादा लोकप्रिय नेता सामान्य हॉटेल किंवा रस्त्यावरील स्टॉलमध्ये खाद्य पदार्थांचा अस्वाद घेतल्याचे पाहायला मिळते. कोकण दौऱ्यात राज ठाकरेंनी त्यांच्यात आतापर्यंत न दिसलेली एक वेगळी झलक दाखवून सर्वांना आश्चर्यचकित केले. त्यांनी चक्‍क एका स्‍टॉलवर वडापाव खाल्‍ला. बुधवारी सायंकाळी देवगड येथील आपला दौरा आटोपून ते कणकवलीच्या दिशेने जात होते. यावेळी त्यांनी अचानक गाडयाचा ताफा थांबवून कोळोशी बाजारपेठेतील एका छोट्याशा स्‍टॉलवर  वडापाव आणि चहाचा मनापासून आस्वाद घेतला. 

राज यांना वडापाव स्टॉलवर पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्‍या. निमित्त होते ते राज ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्याचे. देवगड येथील दौरा आटोपून कणकवलीच्या दिशेने जात असताना राज ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा कोळोशी येथे थांबला. गाडी थांबताच राज यांनी तेथील श्रीकृष्ण उर्फ संदीप शिंदे यांच्या हॉटेल आसरामधील वडापावचा स्टॉल गाठला. राज यांनी सामान्य ग्राहकाप्रमाणे शिंदे यांच्याकडून वडापाव घेतला आणि बाकड्यावर बसून गरम-गरम वडापावचा आस्‍वाद घेवू लागले. काही वेळात ही बातमी परिसरातील लोकांना समजताच नागरिकांनी शिंदे यांच्या हॉटेलवर गर्दी केली. 

आपल्या भाषणातून अनेकांना चिमटे काढणारे राज ठाकरे येथेही गप्प बसले नाहीत. यावेळी त्‍यांनी उपस्थितांना वडापाव खाणार काय? अशी विचारणा केली. राज यांनी अनेक ठिकाणच्या गप्पा करत-करत वडापाव आणि चहाचा आस्वाद घेतला. हॉटेलवर जमलेल्या नागरिकांनाही वडापाव वाटप करण्यास कार्यकर्त्यांना सांगितले. शेवटी वडापाव मस्त होता हो! असे म्हणत शिंदे कुटुंबीयांसोबत त्यांनी फोटो देखील काढला आणि शिंदे यांचा निरोप घेतला.

दरम्‍यान, गेल्‍या वर्षी झालेल्या दौऱ्यात राज ठाकरे जास्त वेळ थांबले नसल्याने अनेकांचा हिरमोड झाला होता. मात्र, या दौऱ्यात त्यांनी हा सगळा वेळ भरून काढत कार्यकर्ते व नागरिकांची मने जिंकली. 

Tags : sindhudurg, district, raj thakeray, vadapav