Sun, May 26, 2019 10:47होमपेज › Konkan › ‘नाणार’ संदर्भात आज राज ठाकरेंची बैठक

‘नाणार’ संदर्भात आज राज ठाकरेंची बैठक

Published On: May 24 2018 1:32AM | Last Updated: May 23 2018 10:29PMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

मनसे नेते राज ठाकरे गुरुवारपासून राजापूर, लांजा, रत्नागिरी, संगमेश्‍वर तालुक्याच्या दौर्‍यावर येत आहेत. या दौर्‍यात पक्ष पदाधिकार्‍यांशी संघटनात्मक विचारविनिमय, प्रतिष्ठित नागरिकांशी विकासात्मक विषयांवर संवाद साधणार आहेत. मनसेचे सरचिटणीस तथा कामगार सेनेचे अध्यक्ष डॉ. मनोज चव्हाण, जिल्हाप्रमुख जितेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ठाकरेंच्या स्वागताची तयारी पूर्ण झाली आहे. या दौर्‍याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. गुरुवारी सकाळी 11 वाजता नाणार प्रकल्पासंदर्भात राज ठाकरेंची शिष्टमंडळासोबत बैठक होणार आहे.

राजापूर येथील एका हॉटेलमध्ये  ही बैठक झाल्यानंतर ते पाचल येथे जाणार आहेत. येथे पक्ष कार्यालयाचे उद्घाटन आणि तालुक्यातील पदाधिकार्‍यांसोबत चर्चा करणार आहेत. दुपारी 3 वा. याच ठिकाणी पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळी 5 वाजता ते लांजात येणार असून, येथे पदाधिकार्‍यांसोबत चर्चा करणार आहेत. येथून सायंकाळी 6 वाजता रत्नागिरीकडे रवाना होऊन रात्री मुक्‍काम करणार आहेत.

रत्नागिरीतील मनसेचे पदाधिकारी नितीन पाटील, महेंद्र नागवेकर, अरविंद मालाडकर, अजित पाटील, सर्वेश जाधव आदींनी राज ठाकरे यांच्या दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर वातावरण निर्मिती होण्यासाठी ठिकठिकाणी पक्षाचे झेंडे, बॅनर उभारले आहेत. रत्नागिरीत शुक्रवारी सकाळी 9 वाजता राज ठाकरे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर कोकण कृषी मंचाच्या मोफत बियाण्यांचे वाटप होणार आहे. सकाळी 10 वाजता फिशरीज कॉलेज प्राध्यापक प्रतिष्ठीत नागरिकांशी बातचित केल्यानंतर मिरकरवाड्यातील मच्छिमारांची भेट घेऊन अडचणी जाणून घेणार आहेत. या कार्यक्रमांनंतर सकाळी 11.30 च्या सुमारास श्री देव भैरीचे दर्शन घेऊन शहरातील छ. शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून ते साळवीस्टॉप येथील पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन करणार आहेत.

दुपारी 12 वाजता ते बावनदी पांगरीमार्गे देवरूखला जाणार असून, 1 वाजता श्री सोळजाई देवीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर आर्ट गॅलरी देवरूख येथे सदिच्छा भेट देऊन दुपारी 3 वा. संगमेश्‍वर तालुक्यातील पदाधिकार्‍यांसोबत चर्चा करणार आहेत. त्यानंतर प्रतिष्ठीत नागरिकांशी संवाद साधून सायंकाळी 5.30 वाजता चिपळूणकडे रवाना होऊन तेथे मुक्‍काम करणार आहेत.