Mon, Jul 15, 2019 23:46होमपेज › Konkan › राज्यकर्त्यांना ‘कोकणी हिसका’ दाखविण्याची गरज : राज ठाकरे

राज्यकर्त्यांना ‘कोकणी हिसका’ दाखविण्याची गरज : राज ठाकरे

Published On: May 23 2018 1:12AM | Last Updated: May 22 2018 10:29PMकुडाळ : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सिंधुदुर्ग मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी असते तर   मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम जलदगतीने झाले असते. आज ज्या गतीने बुलेट ट्रेन व मुंबई-बडोदा मार्गासाठी जमिन संपादन चालू आहे, ती गती मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण कामासाठी दिसून येत नाही. याचे एकमेव कारण म्हणजे कोकणी जनतेने त्यांना आपला ‘कोकणी हिसका’ दाखविलेला नाही, असे खोचक प्रतिपादन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. कोकणचा विकास व्हायला हवा तर राज्यकर्त्यांना ‘कोकणी हिसका’ दाखवा, असे आवाहन करत त्यांनी आपल्या खास शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच निशाणा साधला. 

सिंधुदुर्ग दौर्‍यावर आलेल्या राज ठाकरे यांनी कुडाळ येथे मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांच्यासोबत मनसे नेते  शिरीष सावंत, नितीन सरदेसाई, मनसे सरचिटणीस माजी आ. परशुराम उपरकर, जिल्हाध्यक्ष धीरज परब, राजन दाभोलकर आदी उपस्थित होते. 

राज ठाकरे म्हणालेे, रायगड जिल्ह्यानंतर आपला हा सिंधुदुर्गात दौरा आहे. दोन दिवसानंतर रत्नागिरीत  दौरा होईल. पक्ष संघटना बांधणीसाठी हा दौरा असून या दौर्‍यात मेळावे नाहीत. पक्ष संघटनेत नवीन बदल करायचे आहेत. नवीन पदे नेमावयाची आहेत. तसेच काही नवीन पदे निर्माण केली आहेत ती पदे द्यायची आहेत. त्यासाठी या दौर्‍यांचे आयोजन आहे. 

पालघरमध्ये उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भाजपने प्रचारासाठी आणले तरी हिंदुंच्या मतावर त्याचा काही फरक पडणार नसल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रामध्ये काय राजकारण व्हायचे ते होईल, पण राज्यात प्रादेशिक पक्षच हवा, राष्ट्रीय पक्षांना राज्यात स्थान मिळता कामा नये. कारण राष्ट्रीय पक्षांना  इथल्या अस्मितेबद्दल जाण नसते, ती जाण प्रादेशिक पक्षांनाच असते. कर्नाटकात सिद्धरामय्या यांनी जी हिंमत दाखवली ती महाराष्ट्रात दाखविली जाते का? असा सवाल   करून महाराष्ट्राचा विचार झाला असता तर नाणारमध्ये प्ररप्रांतियांची जमिन विकत घेण्याची हिंमत झाली नसती, असा दावा त्यांनी केला.

पेट्रोल-डिझेल दर वाढीबाबत राज ठाकरे यांनी यावेळी माध्यमांवर टीका केली. चार वर्षापूर्वी  पेट्रोल- डिझेलचे दर वाढले तर माध्यमे आवाज उठवित होती, पण आता तो आवाज दबला असल्याचे सांगितले. एखाद्या उमेदवाराला शुन्य मते कशी पडतात? निदान त्या उमेदवाराचे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे तरी त्याला मत पडणारच, असे सांगत त्यांनी इव्हीएम मशिनवर आपला संशय कायम असल्याचे सांगितले