Sat, Jul 20, 2019 16:03होमपेज › Konkan › सिंधुदुर्गात मुसळधार; अतिवृष्टीचा इशारा!

सिंधुदुर्गात मुसळधार; अतिवृष्टीचा इशारा!

Published On: Jun 06 2018 1:43AM | Last Updated: Jun 05 2018 11:24PMसिंधुदुर्गनगरी: प्रतिनिधी

अखेर नैऋत्य मोसमी पाऊस म्हणजेच मान्सून तळकोकणा नजीक येऊन धडकला आहे. मंगळवारी दुपारी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्व भागांत मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, त्याचवेळी अरबी समुद्रातही तसा पट्टा तयार झाल्याने मान्सून धो-धो पाऊस घेऊन येतो आहे. बुधवारपासून शनिवारपर्यंत तीन दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात व इतर भागामध्ये अतिवृष्टी होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याचे शास्त्रज्ञ दिनेश मिश्रा यांनी व्यक्त केला आहे. भारतीय हवामान खात्याकडून अधिकृतरीत्या दोन दिवसांत मान्सून दाखल झाल्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.

गेले काही दिवस ढगांचा गडगडाट व वादळी वार्‍यासहीत पूर्व मोसमी पाऊस पडत होता. मात्र, मंगळवारची सकाळ शांत होती. आकाशात ढग दाटून आले होते. संपूर्ण जिल्हाभर दुपारी पावसाला सुरुवात झाली आणि मान्सून दाखल झाल्याची खात्री पटली. बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र स्वरूपाचा आहे. त्याला अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याची जोड मिळाली आहे. त्यामुळे मान्सूनची गती वेगाने सुरू आहे. मंगळवारी खरे तर रत्नागिरीपर्यंत पाऊस पडला. मुंबईतही ढगाळ वातावरण आहे. मुंबईत मान्सून पोहोचायला आणखी दोन दिवस लागतील. तर तळकोकण, कोल्हापूर व इतर भागात 6 जूनपासून 9 जूनपर्यंत धुवाँधार पर्जन्यवृष्टी होईल, असे मिश्रा यांनी म्हटले आहे.

मान्सूनचे आगमन झाले तरीदेखील हवामान खाते मान्सूनच्या आगमनाची अधिकृत घोषणा लगेचच करत नाही. किमान दोन ते तीन दिवस पाऊस पडल्यानंतरच मान्सूनची घोषणा केली जाते. या नियमानुसार व परंपरेनुसार गुरुवारपर्यंत कोकणात मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा होऊ शकते.