Thu, Nov 15, 2018 01:03होमपेज › Konkan › पावसाची पाठ, तरीही आघाडी

पावसाची पाठ, तरीही आघाडी

Published On: Jun 15 2018 11:49PM | Last Updated: Jun 15 2018 10:41PMरत्नागिरी ः प्रतिनिधी

जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाल्यानंतर पावसाने पाठ फिरविली असली तरी गतवर्षीच्या तुलनेत जूनच्या पहिल्या पंधरावड्यात पावसाने आघाडी घेतली आहे. गतवर्षी 15 जून रोजी जिल्ह्यात 317 .74 मि. मी. सरासरी नोंदविली होती. यावर्षी 15 जूनपर्यंत जिल्ह्यात 416. 28 मि. मी. पाऊस झाला असून, तो गतवर्षाच्या तुलनेत सरासरी 100 मि.मी.ने तर एकूण  पावसाच्या तुलनेत 1000 मि. मी. ने आघाडीवर आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या रविवारी जूनच्या पहिल्या पावसाळी महिन्याच्या तुलनेत विक्रमी पाऊस झाला होता. मात्र, त्यानंतर मोसमी पाऊस सक्रिय होण्यात अडथळे निर्माण झाले. अरबी समुद्रात उद्भवलेल्या वातावरणीय अडचणीमुळे कोकणातील पाऊस रोडावला असला तरी वादळी  वार्‍यासह जोरदार अतिवृष्टीची मळभ कोकणावर कायम असल्याचा दावा हवामान विभागाने केला आहे. दरम्यान, जिल्ह्यात जूनच्या पहिल्या पंधरावड्यातच पावसाने आघाडी घेतली आहे. पावसाचा जोर ओसरलेला असला तरी पावसाने गतवर्षाच्या तुलनेत 1000 मि. मी.ची आघाडी घेतली आहे. गतवर्षी 15 जून रोजी जिल्ह्यात  2859. 70 मि.मी. एकूण पाऊस झाला होता. यावर्षी 15जून रोजी जिल्ह्यात 3746. 51 मि.मी. पाऊस झाला आहे. तर सरासरीच्या तुलनेतही पाऊस 100 मि.मी.ने आघाडीवर आहे.

इंडियन मीटिऑरॉलॉजिकल डिपार्टमेंट अर्थात ‘आयएमडी’  मुंबई आणि कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. उकाडा काहीसा कमी झाला, मात्र दुसर्‍या आठवड्यात पावसाने दडी मारली. त्यामुळे पुन्हा एकदा घामाच्या धारा वाहू लागल्या. मुंबईसह कोकणपट्ट्यात 17 आणि 18 जूनला मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अगोदरचे अंदाज फोल ठरवणार्‍या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.