Sun, Feb 17, 2019 21:30होमपेज › Konkan › जिल्ह्यात दमदार पाऊस

जिल्ह्यात दमदार पाऊस

Published On: Jun 09 2018 11:35PM | Last Updated: Jun 09 2018 11:35PMरत्नागिरी ः प्रतिनिधी

शनिवारी दिवसभर पावसाची संततधार तर काही भागात दमदार वाटचाल सुरूच होती. दरम्यान, आगामी 36 तासांत कोकण किनारपट्टीवर अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. जिल्ह्यात सध्या पेरणीचा उरक सुरू झाला असून संथ पाऊस सरींच्या साथीने अनेक भागात खरिपाची कामे बळीराजाने हाती घेतली आहेत.

आगामी 36 तासांत सागरी भागात उधाणाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने वसई ते मालवण किनारपट्टी भागात मासेमारी अथवा सागरी पर्यटनाला मज्जाव करण्याच्या सूचना प्रशासनांना दिल्या आहेत. त्यानुसार पोलिस यंत्रणेलाही सतर्कता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  

शनिवारी दिवसभरात 491 मि. मी. पावसाची नोंद झाली. तर सरासरी पर्जन्यमान 54.56 मि.मी. नोंदविले. पावसाने जिल्ह्यात सातत्य ठेवले आहे. 1 जूनपासून सुरू झालेल्या मोसमी पावसाने अनेक भागात हानीही केली. शनिवारी  दिवसभर पावसाने जिल्हाभर ठिय्या धरला होता. हवामान विभागाने अतिवृष्टीची अंदाज वर्तविला होता. मात्र पावसाने जिल्ह्यात संततधार तर काही भागात मुसळधार सुरूच ठेवली. पावसामुळे अनेक भागातील वाहतुकीवरही परीणाम  झाला.  शनिवारी अनेक भागात बाजाराचा दिवस असल्याने पावसाने वर्दळीमध्ये तारांबळ उडविली.  रत्नागिरी शहरात भरणार्‍या आठवडा बाजारातही पाऊस सक्रिय असल्याने नागरिकांची त्रेधा उडाली. 

शनिवारी सर्वाधिक पाऊस रत्नागिरी तालुक्यात नोंदविला.  तर सर्वात कमी पर्जन्यमान संगमेश्‍वर तालुक्यात झाले. मंडणगड 23, दापोली 21, खेड 105, गुहागर 110, चिपळूण 23, संगमेश्‍वर 9, रत्नागिरी 134 लांजा 11 आणि राजापूर तालुक्यात 55 मि. मी. पावसाची नोंद झाली. नियंत्रण कक्षातून मिळालेल्या माहितीनुसार चिपळूण तालुक्यात येगाव येथे एका गोठ्याची पडझड झाली. रत्नागिरी शहरानजीक भाट्ये येथे रस्त्यावर वीज वाहिन्या तुटून पडल्याने येथील भागातील वीज पुरवठा बंद करण्यात आला होता.  राजापूर तालुक्यात देवी हसोळ येथे एका घरावर झाड कोसळल्याने हानी झाली. नुकसान झालेल्या मालमत्तेचे पंचनामेे करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने केल्या आहेत. दरम्यान आगामी 36 तासाच मान्सून सक्रिय होऊन कोकण किनारपट्टीवर अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या कालावधीत सागरी भागात उधाणाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने वसई ते मालवण किनारपट्टी भागात मासेमारी अथवा सागरी पर्यटनाला मज्जाव  करण्याच्या सूचना  प्रशासनांना दिल्या आहेत.